जळगावातील दोघे तरुण कात्रजजवळ अपघातात ठार

भुसावळ/जळगाव : पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील दोघा तरुण विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री मित्रांसोबत जेवण करून दुचाकीवरून परतत असताना कात्रजजवळ अपघात घडला. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रोहित शामसुंदर मणियार (21, गांधी नगर, जळगाव) व समीर विलास काळे (23, जुने जळगाव) अशी मयतांची नावे आहेत.

कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित मणियार हा पुण्यातील सिंहगड येथे मेकॅनिकल इंजिनिअरींच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता तर समीर विलास काळे याचे इलेक्ट्रीक इंजिनिअरींग पूर्ण झाले असून जर्मनी येथे तो उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याने पुण्यात 9 रोजी होणार्‍या परीक्षेच्या तयारीसाठी गेला होता. रोहित व समीर हे दोघे मित्र आपल्या दुचाकीवरून तर अन्य पाच मित्र चारचाकीने कात्रजजवळ बुधवारी रात्री जेवणासाठी गेले होते व रात्री उशिरा जेवण आटोपल्यानंतर पाच जण चारचाकी वाहनाने परतले मात्र रोहित व समीर यांच्या वाहनाला कात्रजच्या जुन्या पुलाजवळ अपघात घडल्याने दोघांचा मृत्यू झाला. मुलांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

जळगावात दोघांवर अंत्यसंस्कार
शवविच्छेदन केल्यानंतर दोघा तरुणांचा मृतदेह जळगावातील निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, समीर काळे याच्या पश्चात आई व आजोबा असा परीवार असून त्याचे वडील मयत झाले आहेत तर रोहित मणियार याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परीवार आहे.