Private Advt

जळगावातील दोघा तरुणांचा बसाली धरणात बुडाल्याने मृत्यू : 24 तासानंतर आढळले मृतदेह

जळगाव : मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूरजवळील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जळगावातील दोन तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा शोध न लागल्याने सोमवारी पुन्हा त्यांचा शोध घेण्यात आला असता दोघा तरुणांचे मृतदेह हाती लागले. जयेश रवींद्र माळी (24, रा.वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (23, रा.खेडी, जळगाव) अशी मयत तरुणांचे नाव आहेत. मयत जयेश माळी या तरुणाचा वाढदिवस असल्याने पर्यटनासाठी मित्र बसाली धरणावर गेले मात्र पाण्यात खेळताना जयेश बुडाला तर त्यास वाचवताना उज्ज्वलही सरसावल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

वाढदिवसालाच कवटाळले मृत्यूने
जळगावातील तरुण जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस असल्याने त्याच्यासह 16 मित्र विविध वाहनांद्वारे बर्‍हाणपूरजवळील बसाली धबधब्यावर रविवारी पर्यटनासाठी गेले होते. यावेळी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडू लागताच त्याला वाचविताना उज्ज्वलही पाण्यात बुडाला. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्यानंतर दोघांच्या शोधार्थ रात्री रविवारी 11 वाजेपर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र दोघेही सापडले नाही. त्यानंतर सोमवारी सकाळपासून शोध मोहिम राबविण्यात आली. दुपारी 12.30 वाजता धबधब्याच्या एका कपारीत दोघा तरुणांचे मृतदेह आढळताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बर्‍हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.