Private Advt

जळगावातील तरुण अपघातात जागीच ठार

जळगाव : जळगाव-औरंगाबाद महामार्गावील वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट रस्त्याच्या कडेला जावून पडल्याने जळगावातील तरुण जागीच ठार झाला तर सहकारी दोघे मित्र जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. विक्की उर्फ व्यंकटेश सुधाकर सपकाळे (21, शिवाजी नगर, जळगाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर शिवाजी नगरातीलच रहिवासी असलेले करण भगत, धीरज शिरसाठ अशी जखमींची नावे आहेत.

परीक्षा देवून परतताना अपघात
गोसेगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद येथे बारावीचा पेपर देण्यासाठी जळगावच्या शिवाजी नगरातील व्यंकटेश सुधाकर सपकाळे, करण भगत, धीरज शिरसाठ हे तिघे बुलेट (क्र.एम एच 19 डीपी 7799) ने गेले होते व पेपर दिल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर जळगावकडे परत येत होते. वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बुलेट रस्त्याच्या कडेला पडल्याने डोक्याला मार बसल्याने व्यंकटेश सुधाकर सपकाळे याचा मृत्यू झाला तर करण व धीरज यांना हाता पायाला मार लागला. दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर सिंहगड हॉटेलचे मालक विशाल जोशी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथमोपचारासाठी वाकोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, ईश्वर देशमुख, विनय सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहुर पोलिसात सुरूवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.