जळगावातील तरुणाला 43 हजारांचा गंडा

जळगाव : साडेनऊ लाखांचा लकी ड्रा लागल्याचे आमिष दाखवत जळगावातील तरुणाला 43 हजारांचा गंडा घालण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
हेमंत गुलाब चौधरी (34, एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. गुरूवार, 28 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हेमंत चौधरी हा तरुण घरी असतांना त्याच्या मोबाईलवर नऊ लाख 50 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरील अनोळखी व्यक्तीने तुम्हाला लकी ड्रॉ म्हणून नऊ लाख 50 हजार रुपये जिंकले आहे, असे सांगून जीएसटी म्हणून 9 हजार 500 रुपये खात्यात जमा करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार, हेमंतने गुगल पे वरून राहूल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यात नऊ हजार 500 रुपये भरले. त्यानंतर पुन्हा इन्कम ट्रॅक्स म्हणून 33 हजार 950 रुपये सेंड करण्याचे सांगितले. त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले परंतु लकी ड्रॉ चे पैसे न आल्याने व आपली 43 हजार 450 रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने शुक्रवार, 1 जुलै रोजी दुपारी चार वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निलेश भावसार करीत आहे.