Private Advt

जळगावातील तरुणाची वादानंतर मित्रांनीच केली हत्या : दोघे संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मिस्तरी काम करणार्‍या 20 वर्षीय तरुणाच्या डोक्यात मोठा दगड टाकून व चाकूचे वार करून मित्रांनीच खून केल्याची घटना शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळच्या मालधक्क्याजवळील गोदामाच्या समोर मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा मित्रांना अटक करण्यात आली. अनिकेत गणेश गायकवाड (20, रा.राजमालती नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे तर सागर बाळू समुद्रे (19, राजमालती नगर, जळगाव) व सुमित संजय शेजवळ (18, पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. खुनाच्या घटनेनंतर जळगाव गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात संशयीतांच्या मुसक्या आवळल्या.

जुन्या वादातून केली हत्या
राजमालती नगरात गणेश रमेश गायकवाड हे पत्नी सारीका आणि मुले अनिकेत (मयत), विशाल यांच्यासह वास्तव्यास आहेत. गणेश गायकवाड हे सुरत रेल्वे गेटजवळ येथील माल धक्यावर हमाली काम करतात तर त्यांची दोन्ही मुले मिस्तरी काम करतात. मंगळवार, 24 रोजी गायकवाड हे घरी आल्यानंतर त्यांना मुलगा अनिकेत हा घरी आढळला नाही व रात्री उशिरापयर्र्ंत कुटुंबियांनी त्याची वाट पाहिली मात्र तो घरी परतला नाही मात्र मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गल्लीतील अर्जुन धोबी हे पोलिसांसह आल्यानंतर त्यांनी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ माल धक्क्याच्या गोदामासमोर एक मृतदेह सापडला असून तो तुमचा मुलगा अनिकेतसारखा असल्याने खातरजमा करण्यासाठी गायकवाड यांना नेले व मृतदेह पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला. या प्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार सुरुवातीला अज्ञातांविरोधात जळगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर तपासात अनिकेतचे मित्र सागर व सुमित यांनी जुन्या वादातून ही हत्या केल्याची बाब समोर आली. दोघा आरोपींना जळगाव गुन्हे शाखेने अटक करीत शहर पोलिसांच्या ताब्यात सोपवले.

चॉपरचे वापर करीत दगड डोक्यात मारून केला खून
पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्याजवळ अनिकेत गायकवाड यास बोलावल्यानंतर तिघा मित्रांनी मद्य प्राशन केले व यात मित्रांमध्ये वाद उफाळून आल्यानंतर चाकूरे वार करण्यात आले व नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून चेहरा विद्रुप करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आला.

काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
खुनानंतर पसार झालेले आरोपी मेहरुण तलाव परीसरात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपींच्या बुधवारी मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, एएसआय रवी नरवाडे, युनूस शेख इब्राहीम, संजय हिवरकर, राजेश मेढे, सुनील दामोदरे, संतोष रामस्वामी मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, चालक रमेश जाधव आदींच्या पथकाने केली.