Private Advt

जळगावातील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : फर्निचर बनवण्याचे काम करणार्‍या 35 वर्षीय व्यावसायीक तरुणाने दुचाकी रेल्वे रुळाजवळ लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना बुधवार, 20 रोजी दुपारी घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. किरण पांडूरंग मिस्तरी (35, व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
हरीविठ्ठल नगरातील किरण मिस्तरी हा तरुण आपल्या आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता शिवाय फर्निचरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवार, 17 एप्रिल रोजी त्याच्या साल्याचे लग्न असल्याने पत्नी मुलांसह माहेरी होत्या तर लग्न आटोपून पुन्हा किरण मिस्तरी हा जळगावी राहत्या घरी परतला. बुधवार, 20 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.2839) ने शहरातील पलोड शाळेजवळील रेल्वे बोगद्याजवळ लावली व रेल्वे रुळावरील डाऊन लाईनवरील रेल्वे खांबा क्रमांक 414 च्या 3-5 दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

तालुका पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल लिलाधर महाजन यांनी धाव घेतली. दुचाकीच्या नंबरवरून मयताची ओळख पटली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलिस कॉन्स्टेबल लिलाधर महाजन करीत आहे.