Private Advt

जळगावातील खुनांना अनैतिक संबंधाची किनार ! : 24 तासात दोन तरुणांची हत्या

जळगाव : 24 तासांच्या अंतरात दोन तरुणांच्या झालेल्या खुनांच्या घटनांमुळे जळगाव शहर हादरले तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही खुनातील आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिस यंत्रणेला यश आले असून दोन्ही खुनांना अनैतिक संबंधाची किनार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या घटनेत समता नगर भागातील रहिवासी सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून संशयीत आरोपी अमित नारायण खरे (डॉ.आंबेडकर नगर, समता नगर, जळगाव) याने शुक्रवारी रात्री खून केला तर दुसर्‍या घटनेत जळगावच्या शिवाजी नगर भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या संबंधाच्या संशयातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली. जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली.

24 तासांच्या अंतरात दोन खून
हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणार्‍या सागर नरेंद्र पवार (28, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, समता नगर, जळगाव) या तरुणाचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी अमित नारायण खरे यास होता व त्या रागातून शनिवारी मध्यरात्री संशयीत आरोपीने सागरवर चाकूचे मानेवर घाव घातल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी काही वेळेत आरोपी अमित खरे यास अटक करण्यात येवून त्याच्या विरोधात रामानंद नगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात पतीपासून विभक्त विवाहिता दोन मुलांसह राहते. या महिलेशी नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाशी जुनी ओळख असल्याने त्याचेही महिलेच्या घरी येणे-जाणे होते तर संशयीत आरोपी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. शनिवारी नरेश शिवाजी नगर हुडको भागात आल्यानंतर आकाशही तेथे आला व त्यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर आकाशने जवळील चाकू/चॉपरसारख्या धारदार शस्त्राने नरेशच्या पोटात दोन वेळा वार केल्याने नरेशचा मृत्यू ओढवला. जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेसह संशयीत आरोपी आकाशला अटक केली तर महिलेलादेखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.