Private Advt

जळगावसह राज्यभरात 130 ठिकाणी गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी : 33 गुरे जप्त ; पाच संशयीत जाळ्यात

चाळीसगाव/भुसावळ : जळगावसह राज्यभरातील 130 ठिकाणी गुरांची चोरी करणारी टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. अटकेतील आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, धुळे, मनमाड अशा 14 ठिकाणांहून गुरे चोरी करण्यासह नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातही गुरे चोरीची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत 33 गुरे जप्त करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

गुरे चोरणार्‍या टोळीचा राज्यभरात धुमाकूळ
चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पधूधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी 24 नोव्हेंबर रोजी नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदी दरम्यान रोहिणी गावाजवळील हॉटेल तिरंगाजवळ गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. या टोळीची सखोल चौकशी केल्यानंतर राज्यभरात या टोळीने धुमाकूळ घातल्याचे उघड झाले होते. अटकेतील संशयीतांनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, धुळे, मनमाड आदी ठिकाणी गुरांची चोरी केल्याची कबुली दिली शिवाय जळगाव जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात तब्बल 130 ठिकाणी गुरांची चोरी केल्याचे मान्य केले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील नऊ, मेहुणबारे हद्दीतील तीन व चाळीसगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणाहून आरोपींनी गुरांची चोरी केल्याचे तपासात उघड झाले तसेच नाशिक, धुळे व औरंगाबाद भागातील 20 ठिकाणावरून आरोपींनी गुरे लांबवल्याचे पथकाला सांगितले.

33 गुरांसह लाखोंची रोकड जप्त
संशयीतांनी विविध ठिकाणाहून चोरलेली एकूण 33 गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. त्यात सात मोठ्या गायी, आठ कालवडी, 12 गोर्‍हे, सहा वासरे मिळून 33 गुरे जप्त करण्यात आली तसेच गुन्ह्यातील वाहन टाटा सुमारे क्रमांक (एम.एच.03 सी.बी.5231) व दुचाकी (एम.एच.41 ए.एच.2694) जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील पाचही आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दाखल चार गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहा.पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक लोकेश पवार, हवालदार युवराज नाईक, नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांतीलाल पगारे, भूपेश वंजारी, शांताराम पवार, प्रेमसिंग राठोड, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, कैलास पाटील, लालसिंग पावरा, दिनेश पाटील, भगवान पाटील, संदीप माने, ओंकार सुतार, भगवान माळी, जयंत सपकाळे, शंकज जंजाळे, दत्तू महाजन, राजेंद्र पाटील, प्रवीण सपकाळे, अनिल आगोणे, मनोहर पाटील यांनी केली.