जळगावच्या पक्षीमित्रांची आतंरराष्ट्रीय पातळीवर नोंद!

0

जळगाव । जळगावच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षी मित्रांना सातपुड्यात आढळलेल्या दुर्मिळ कृष्ण गरुड (ब्लॅक ईगल) व वृक्षसर्पी (ट्री क्रीपर) या दोन्ही पक्षांची नोंद (संक्षिप्त शोधपत्र) इला फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत करण्यात आली आहे. जळगावातील पर्यावरणप्रेमींच्या नोंदी आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध होत आहेत, ही बाब संस्थेच्या कार्यास बळ देणारी घटना असल्याची माहीती आज सोमवारी संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे यांनी दिली. दरम्यान, नोंद झाल्याबद्दल पक्षीमित्रांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

अभ्यासकांद्वारे संशोधन, शास्त्रशुध्द नोंदी घेण्याचे कार्य
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांद्वारे 8 वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील सातपुडा वनक्षेत्र आणि मुक्ताईभवानी व्याघ्र प्रकल्प चारठाना या वनक्षेत्रातील जैवविविधता संशोधन आणि शास्त्रशुद्ध नोंदी घेण्याचे कार्य सुरु आहे. या संशोधनात दुर्मिळ पक्षी, सरीसृप, वनस्पती, वृक्ष कीटक, यांच्या नोंदी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून घेतल्या जात आहेत. नुकत्याच संस्थेचे पक्षी अभ्यासक अमन गुजर, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे यांच्या पक्षांवरील रिसर्च नोट आंतरराष्ट्रीय पत्रिकेत नोंदविल्या गेल्या आहेत.

पथकाला आढळला वृक्षसर्पी
मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पात चारठाना वनक्षेत्रात प्रथम स्पॉटेड ट्री क्रीपर हा पक्षी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकाला आढळला होता. 2 मे 2015 रोजी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अमन गुजर, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे यांना हा दुर्मिळ पक्षी आढळला. त्याचे सुंदर छायाचित्र अमन गुजर यांनी टिपले होते. खान्देशातील हा पहिला फोटो ग्राफिक रेकॉर्ड असावा या अनुषंगाने तपास करून याची आंतरराष्ट्रीय पत्रिकेत नोंद करण्यासाठी संस्थेचे तांत्रिक विभाग प्रमुख पक्षी अभ्यासक अमन गुजर प्रयत्न करत होते. पक्षी अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाने त्याला यश आले आहे.

पाटणादेवी परसरात
अभ्यास दौराच्यावेळी ब्लॅक ईगल ( कृष्ण गरुड) 27 ऑगस्ट 2016 पाटणादेवी परिसरात अमद गुजर यांना दिसल्यानतंर त्यांनी छायाचित्र टीपले होते. यावेळी राहुल सोनवणे, अमन गुजर, रवींद्र सोनवणे, प्रसाद सोनवणे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, सतीश कांबळे, चेतन भावसार, अमोल देशमुख, योगेश गालफाडे, हेमराज शिंदे, सागर खेडकर, रिषी राजपूत अशांची टीम होती. यासाठी एल.एम.राठोड यांचे सहकार्य लाभले.