Private Advt

जळगावच्या तरुणाला बेदम मारहाण : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : तरुणाने कुत्र्याला हटकल्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा
शहरातील शाहू नगरातील ताज पान सेंटर जवळील रहिवासी शेख वसीम शेख मुसा (30) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. प्लंबरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार, 7 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शेख वसीम हा कामावरुन घरी जात असतांना पाळीव कुत्रा शेख वसीम यांच्या अंगावर भुंकला होता. दरम्यान, शेख वसीम यांनी त्याला हटकले असता, त्याचा राग आल्याने सरदार तडवी (रा.आदिवासी हाऊस, शाहुनगर) याने शेख वसीम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून सरदार तडवीचे दोघे भाऊ नामदार तडवी व रहीम तडवी व जम्बो तडवी हे तिघे त्याठिकाणी आले. यावेळी सरदार तडवी यांनी त्यांच्या हातातील टेन्ट हाऊसचा लोखंडी दांडा शेख वसीम यांच्या डोक्यात हाणला तर जम्बो तडवी आणि रहिम तडवी, नामदार तडवी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या शेख वसीम याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत शहर पोलीस ठाण्यात शेख वसीम याच्या फिर्यादीवरून बुधवार 9 मार्च रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयीत आरोपी सरदार तडवी, नामदार तडवी, जम्बो तडवी, रहिम तडवी (सर्व रा.आदिवासी हाऊस शाहुनगर) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.