जळगावच्या कचर्‍याने लगतच्या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले

0

सांडपाण्याने गिरणा नदीसुद्धा प्रदूषित ; आठ गावांचा स्मरण पत्राद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव – शहरातील कचर्‍याची विल्हेवाट महापालिकेचे कर्मचारी शहरालगत असलेल्या गावांच्या शिवारात लावत आहेत. कचरा जाळल्याने प्रचंड धुर, प्रदूषणाने आठ गावांमधील नागरीकांचे आरोग्य बिघडले आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता गिरणा नदी पात्रात थेट सोडले जात असल्याने गुरा-ढोरांसह गावकर्‍यांना प्रदूषित पाणी सेवन करावे लागत आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही महापालिकास्तरावरून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आठही गावातील गावकर्‍यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा स्मरण पत्राद्वारे आयुक्तांना दिला आहे.

जळगाव शहरालगत असलेल्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा., टहाकळी खु., आव्हाणी, पाळधी बु., जळगाव तालुक्यातील आव्हाणे, सावखेडा बु., एरंडोल तालुक्यातील टाकरखेडे, वैजनाथ या गावांमधील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदने दिली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने निवेदनाद्वारे कचर्‍याचा प्रश्न 10 ऑक्टोबर 2018 पासून महापालिकेच्या लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिक्षक, पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ यांच्याकडे निवेदने देण्यात आलीत. मात्र महापालिकेसह प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही त्यावर ठोस तोडगा निघाला नाही. महापालिकेचे कर्मचारी बेकायदेशीररित्या संबंधीत गावांच्या शिवारात कचरा टाकून जाळत आहेत. त्यांना हटकविले असता शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करू अशा धमक्या देत असल्याने गावकरी हतबल आहेत. कचरा जाळतांना प्रचंड धूर तयार होतो. त्यामुळे वायू प्रदूषण होऊन परिसरात राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकर्‍यांच्या पिकांवरसुद्धा कचर्‍याचा परिणाम जाणवत असून उत्पादन घटले आहे. जमीनीमध्ये प्लास्टीक कचरा वाढत असल्याने त्या नापिक होत आहेत.

तर गावकर्‍यांचा उद्रेक

गिरणा नदी आजूबाजूच्या गावांसाठी जीवनदायीच. मात्र शहरातील गटारींतून येणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यातूनही विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रत्येक घरात रोज कुणीनाकुणी आजारी पडत आहे. साथीच्या आजारांमुळे नागरीक त्रस्त आहेत. वारंवार निवेदन देऊनही गावकर्‍यांच्या आरोग्याशी संबंधीत असलेल्या संवेदनशील प्रश्नांवर तत्काळ तोडगा निघाला नाहीतर गावकर्‍यांचा उद्रेक होईल, रास्ता रोको, घेराव आंदोलन, आमरण उपोषण यासह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी महापालिकेसह संबंधित यंत्रणेची असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे

Copy