जलिकट्टू पारंपरिक खेळासाठी तामिळनाडू एकवटले!

0

नवी दिल्ली । तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘जलिकट्टू’ या पारंपरिक खेळावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले असून, बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांपासून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच आवाज उठवला आहे. तामिळनाडूत शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली होती. अख्खे राज्य ठप्प पडले होते. तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.खासदार कनिमोझी यांनी चेन्नई एगमोर रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ केला.

मसुदा केंद्राकडे; सरकार अध्यादेश काढणार!
केंद्र सरकारच्यावतीने महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात जलिकट्टूसंबंधीचा निर्णय एका आठवड्यापर्यंत देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. राज्यात निदर्शने सुरू असून, अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जलिकट्टूसंबंधी एका आठवड्यापर्यंत निकाल दिला जाणार नाही. दरम्यान, या बंदीविरोधात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी यासंबंधी लवकरच अध्यादेश जारी करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. यासंबंधीचा मसुदा गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, याबद्दल संविधानाच्या अभ्यासकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात!
पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणार्‍या जलिकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली बंदी घातली होती. मात्र मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र न्यायालयाने ही बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला होता. त्यामुळे तामिळनाडू राज्यात संतापाचे वातावरण असून, मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही बंदी हटवण्याची मागणी केली होती.