जलस्त्रोतांचे संवर्धन करायचे असेल तर लोकसहभाग असणे अत्यंत आवश्यक

0

नवापूर। ज लस्त्रोत संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज आहे. वनवासी उत्कर्ष समितीसारख्या स्वयंसेवी संस्थानी ग्रामस्थांमध्ये श्रमदान व लोकसहभागाचे महत्व पटवून उभी केलेली लोकचळवळ ही कौतुकास्पद आहे. विकासासंबंधी येथील जनतेमध्ये सकारात्मक भाव असून आगामी काळात गडद गावासह नवापूर तालूका हा आदर्श तालुका होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला आहे. श्रमदानाला सूरवात करण्यापूर्वी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी जलप्रतिज्ञा घेतली. जलप्रतीज्ञेने भारावून जावून जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला.

जलदुत प्रकल्प : या कार्यक्रमात ग्रा.पं. गडदने तयार केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा व एटीएम व्दारे शुध्द पाणी देण्याच्या प्रकल्पाचा देखील शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना वनवासी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष मुकूंद निकम यांनी केली. सेवावर्धीनीचे सोमदत्त पटवर्धन यांनी मागील दोन वर्षा पासुन सुरु असलेल्या जलदुत प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी नाबार्डचे जिल्हाविकास प्रबंधक राजेश चांदेकर, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सेवावर्धीनीचे सोमदत्त पटवर्धन, हर्षन पाटील गडदच्या सरपंच कुंदाताई वळवी, बंधारफळीचे सरपंच रामु गावित हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. संचालन प्राचार्य अनिल वेंडाइत यांनी केले.

महिलांची उपस्थिती जास्त : कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलीत करण्याऐवजी घागरी (माठा) मध्ये मान्यवरांच्या हस्ते पाणी टाकून करण्यात आले. आदिवासी पारंपारीक पध्दतीने ढोल वाजवुन गावाच्या सिमेवर जिल्हाधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सिमेंट बंधार्‍याच्या व गॅबियन बंधा-याचे भुमिपुजनासाठी जवळपास दीड की.मी. चा प्रवास जिल्हधिकार्‍यांनी नदीतून ग्रामस्थांसह भरदूपारी पायी केला. गॅबियन बंधार्‍याचे बांधकाम रणरणत्या उन्हात ग्रामस्थांनी श्रमदान करुन दुपारी 12 ते 2 असे दोन तासात पूर्ण केले. श्रमदानात गडदच्या ग्रामस्थांसह बंधारफळी व बेडकी येथील ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतल्या त्यात विशेषतः महिलांची उपस्थिती जास्त होती.गडद ग्रामस्थांचे व सरपंच यांच्या उल्लेख करुन त्यांचा गौरव केला.

विकासाचा कृती आराखडा
लोकसहभागातून उभ्या राहणार्‍या कामांना सर्व शासकीय विभागांनी तत्परतेने सहकार्य करण्याची सुचना उपस्थित अधिकार्‍यांना केली. जलस्त्रोत संवर्धनातुन उभ्या राहणार्‍या कामातुन विविध प्रकारचे पूरक व्यवसाय निर्माण होवून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संध्या वाढून आर्थिक स्थर उंचावण्याच्या देखील मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी नवापूर तालुक्यातील गडद येथे आयोजित करण्यात आलेल्या जलस्त्रोत संवर्धनाचा समन्वीत प्रयोग कार्यक्रमात बोलताना केले. वनवासी उत्कर्ष समितीने ग्रामस्थ, विविध तज्ञ व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलस्त्रोतावर आधारित परीसरातील विकासाचा कृती आराखडा सामाजिक कृतज्ञता निधीतून तयार केला आहे.