जलयुक्त शिवार योजनेवर 13 कोटींचा खर्च मात्र जलपातळीत वाढ नाही

0

रावेर : रावेर तालुक्यात जल युक्त शिवार योजन अंतर्गत 12 कोटी 84 लाखांची 429 कामे करण्यात आली शिवाय तालुक्यात सरासरी शंभर टक्के पाऊस होऊन सुध्दा तालुक्याच्या पाण्याच्या पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. सदैव पाण्याखाली असलेल्या तालुक्याला या दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी दहा विहिरी अधिग्रहीत करण्याची वेळ आली. त्यावेळी दैनिक जनशक्तीने सुध्दा कामे निकृष्ट होत असल्याचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता शासनानेच जलयुक्त कामांची चौकशी लावली असून रावेर तालुक्यातील कामांचीदेखील सखोल चौकशीची मागणी होत आहे.

पाण्याअभावी फेकावे लागले केळी खोड
रावेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी यांच्या माहितीनुसार, जलयुक्त शिवाराची कामे झाल्यानंत तालुक्यात शंभर टक्के पाऊस होऊन सुध्दा पाणी मुरलेच नाही. आपल्या स्वतःच्या शेतातील केळीचे दहा हजार खोड पाण्याअभावी फेकून देण्याची वेळ आली. तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.

तालुक्यात या विभागाने केली कामे
रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे वनविभाग, वन्यजीव विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग, जि.प.लघूसिंचन विभाग तर भुसावळ येथील जलसंधारण विभागाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कामे केली आहेत.

12 कोटी 84 लाखांची झाली कामे
रावेर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 2015-16 मध्ये सहा कोटी 74 लाख रुपये खर्च करून 179 कामे करण्यात आली. यावेळी तालुक्यात तब्बल शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होऊन सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी शासनाला अधिग्रहीत करण्याची वेळ आली. 2016-17 मध्ये चाचर कोटी 84 लाख रुपये खर्च करून 139 कामे करण्यात आली तर यावर्षी देखील 105 टक्के पाऊस झाला. 2017-18 मध्ये एक कोटी 23 लाख खर्च करून 99 कामे केली होती तर यावर्षी तालुक्यात 97 टक्के पाऊस होऊन सुध्दा पिण्यासाठी एक विहिर अधिग्रहीत करण्याची वेळ आली. 2018-19 मध्ये तीन लाख 63 हजार खर्च करून 12 कामे करण्यात आली मात्र तालुक्यात दोन विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रशासनावर वेळ आली.

Copy