जलपर्णी हटविण्याची नागरिकांची मागणी

0

सांगवीकरांच्या आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम पवना नदीमध्ये पुन्हा वाढले जलपर्णीचे प्रमाण

सांगवी : जुनी सांगवी परिसरातील असलेल्या मुळा नदीपात्रात जलपर्णी पुन्हा वाढू लागली आहे. त्याचा विपरीत परिणाम सांगवीकरांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. ही जलपर्णी हटवून नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवावे, अशी मागणी नदीकिनारी राहणार्‍या रहिवाशांनी केली आहे. येथील नागरिकांनी, नगरसेवकांनी, सामाजिक संस्थांनी अनेकदा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवदेनाद्वारे, भेटीद्वारे याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र आश्‍वासन देण्यापलीकडे काही होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन ही जलपर्णी काढण्याचे काम केले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा ही जलपर्णी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने ही जलपर्णी काढून निरोगी आरोग्य जगण्यासाठी सहाय्य करावे, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांनी घेतला पुढाकार

मुळा नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसत असून या जलपर्णीमुळे डास-किटकांचा त्रास सांवीगकरांच्या आरोग्यावर उठला आहे. गेल्यावर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे गेल्यावर्षी जलपर्णी हटविण्याचे काम अत्यंत धिम्यागतीने करण्यात आले. मात्र, डासाच्या त्रासाला कंटाळून नागरीकांच्या आरोग्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेवुन जलपर्णी हटविण्याचे काम केले होते. यामध्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, नागरिक, महिला तसेच आबाल-वृद्ध सहभागी झाले होते. यासर्वांनी काम करून जलपर्णी काढून पवनामाई प्रदुषणमुक्त करण्याचे काम केले आहे.

डास-किटकांचे प्रमाण वाढले

सध्या मुळा नदीपात्रात वाढत्या जलपर्णीबरोबरच डास-किटकांच्या उत्पत्तीतही वाढ होऊ लागली आहे. जलपर्णीमुळे मुळा नदीपात्र आच्छादण्यापूर्वीच महापालिका प्रशासनातर्फे जलपर्णी काढायला हवी. जलपर्णीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी या कामासाठी ठेका देण्यात येतो. मात्र, तसे काम अद्यापही केले जात नाही आहे. सर्वसामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्थांनी जलपर्णी काढण्याचे गेल्यावर्षी काम केले आहे. महापालिका प्रशासनातर्फे या कामाचा केवळ दिखावा केला जातो. मुळा नदीपात्रात वाढणार्‍या जलपर्णीमुळे नदीकिनारी राहणार्‍या रहिवाशांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्थांतर्फे जलपर्णी काढण्याचे काम गेल्या चार आठवड्यापासून सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासन दरवर्षी याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्यापूर्वी मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे यांनी केले आहे

Copy