Private Advt

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा

2024 पर्यंत सर्व कुटुंबांना ‘हर घर- नल से जल’

धुळे। ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत ‘हर घर- नल से जल’ पाणीपुरवठा होण्यासाठी जलजीवन मिशन लागू केले आहे. या मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा खा.डॉ. हिना गावित यांनी सोमवारी, 10 जानेवारी रोजी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेच्या
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता येवले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

केंद्र शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबांना 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत दरडोई दररोज 55 लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाड्या-वस्यांवरील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावनिहाय तयार केलेल्या अंदाजपत्रकांना ग्रामसभांची मंजुरी घ्यावी, असेही खा.डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

जलजीवन मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी
जिल्ह्यात जलजीवन मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. ग्रामपंचायतनिहाय प्रकल्प अहवाल येत्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेत ठेऊन मंजुरी घेण्यात येईल, असे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता येवले यांनी जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.