जलचक्र येथील महालक्ष्मी स्टोन क्रशरच्या अवैध उत्खनन प्रकरणी त्रयस्त समिती गठीत

बोदवड : तालुक्यातील जलचक्र येथील 28/2 मध्ये अवैध ऊत्खनन प्रकरणी महालक्ष्मी स्टोन क्रशरवर दंडात्मक कार्यवाही न होता स्वामित्वधनाची 49 लक्ष रुपये रक्कम वसूल करण्यात आली. प्रचलित महसूलच्या कायद्यानुसार पाच पटीनुसार दंडात्मक कार्यवाही न करता फरकाची रक्कम भरुन घेतल्याने उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्यासह तत्कालीन तहसीलदार रविंद्र जोगी, तहसीलदार हेमंत पाटील व तहसीलदार प्रथमेश घोलप यांच्या कारवाईबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केल्यानंतर 1 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार जलचक्र येथील अवैध ऊत्खनन प्रकरणी त्रयस्त समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी असणार आहे.

कारवाईकडे लागले लक्ष
जलचक्र खुर्द तालुका बोदवड येथील मे.महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी, भुसावळ व तहसीलदार बोदवड यांनी फक्त स्वामित्वधनातील फरकाची रक्कम वसूल केली मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी संदर्भात तक्रार केल्यानंतर त्रयस्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्रयस्त समितीच्या अध्यक्षपदी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी व सदस्य पदी तहसीलदार संगायो, पुनर्वसन शाखेचे अव्वल कारकून, पुनर्वसन शाखेचे महसूल सहाय्यक सदस्य सचिवपदी राहणार आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिल्या आहेत.

Copy