जय महाराष्ट्र!

0

या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मंत्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता? अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो, असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते. माझा महाराष्ट्र हा मला प्राणापेक्षा प्रिय असल्याचे कविवर्य कृ. कोल्हटकर यांनी म्हटले होते तसेच कवी कुसुमाग्रज आपल्या कवितेत म्हणतात की, “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा”.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. पण या महाराष्ट्राच्या निर्मितीला रक्तरंजित क्रांती कारणीभूत ठरली. 21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसर्‍या बाजूने बोरिबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे, इ.स. 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. रक्तरंजित क्रांतीनंतर मराठी भाषिक प्रदेश एकसंध करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी अनेक महत्त्वांच्या व्यक्तींंनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे. परंतु, तरीही त्याच महाराष्ट्राला स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यातही संघर्ष करावा लागला. याहून दुसरी दुर्दैवी बाब नव्हती, तरीही महाराष्ट्र झुकला नाही की निराशही झाला नाही. देशाच्या नकाशावर स्वतःचे असे मानाचे स्थान निर्माण केले. आजही राज्याची क्षमता अन्य राज्यांच्या तुलनेत सर्व पातळीवर सरस आहे. उद्योग, व्यवसाय, बँकिंग, विमा, कृषी अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड कायम आहे.

असे असले तरी कालानुरूप महाराष्ट्राच्या या प्रतिमेवर काजळी आली आहे. ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशाला सहकार क्षेत्रासारखी उत्तम व्यवस्था दिली, त्याच सहकार क्षेत्रातील सवार्र्धिक भ्रष्टाचार महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा ठरतो, त्याचा थेट परिणाम म्हणून झालेल्या कृषी क्षेत्राची वाताहत महाराष्ट्राची प्रतिमा आणखीनच मलीन करतो आहे. राज्यातील शेतकरी दररोज आत्महत्या करतो, शेती परवडत नाही, तरी शेती करणे तो सोडत नाही, लाखांचा पोशिंदा असल्याची जाणीव त्याला आहे. त्यामुळे नुकसान होते, लहरी निसर्ग आहे, सरकार शेतमालाला हमीभाव देत नाही, सर्व काही नकारात्मक स्थिती असतानाही तो पिकवतो पण विकायला जातो तेव्हा त्यांच्या पदरात एक फुटकी कवडीही मिळत नाही, महाराष्ट्रात शेतकर्‍यांची अशी विटंबना प्रथमच होत आहे. महाराष्ट्राची निर्मिती करताना महान प्रभूतींनी जी स्वप्ने पाहिली होती, त्याला छेद देणारे दृश्य आज महाराष्ट्रात दिसतंय. लाखो टन तूर घेऊन शेतकरी तूर खरेदी केंद्रासमोर घरदार सोडून आज महाराष्ट्रदिनी उपाशी बसला आहे, त्याला किती वेदना होत असतील. महाराष्ट्राचा इतिहास जाज्वल्य आहे. मात्र, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कौतुक करावा असा अजिबात नाही. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 जणांनी हौतात्म्य दिले, त्याच महाराष्ट्रात विदर्भ वेगळा करण्यासाठी आंदोलने होऊ लागली आहेत. मुंबई शहर केंद्रशासित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मराठी शाळा दिवसागणिक बंद पडत आहेत, कॉन्व्हेंटच्या शाळाचा महापूर आला आहे. मराठी भाषेेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. परप्रांतीयांचा लोेंढा दिवसेंदिवस येतच आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मते निर्णायक ठरली आहेत. शेतकरी आत्महत्या करत होते, आता त्यांच्या मुलीही विवाहाचा खर्च होऊ नये म्हणून आत्महत्या करू लागल्या आहेत, याच महाराष्ट्रात स्त्रीभू्रण हत्या बेसुमारपणे होऊ लागली आहे. त्यासाठी डॉ. खिद्रापुरेसारखे राक्षस गावागावांत बस्तान मांडून आहेत. हुंडाबळी अजूनही कमी झालेले नाहीत. उद्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने आम्ही आजच्या अग्रलेखाची सुरुवात स्फूर्तीदायक केली. मात्र, भूतकाळात रमून त्यातच आनंद मानून घ्यायचे ठरवले तर वर्तमानकाळ व भविष्यकाळ घडवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या अग्रलेखाच्या शेवटाला आम्ही मुद्दाम महाराष्ट्राची सद्यःस्थिती मांडली, यातून राज्यकर्त्यांनी बोध घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करावा, इतकाच काय तो उद्देश!