जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद; उच्च न्यायालयाचे मत

0

चेन्नई : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनाबद्दल मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी संशय व्यक्त केला आहे. जयललितांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांचा मृतदेह उकरून काढण्याचे आदेश का देऊ नयेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. जयललितांच्या निधनाबद्दल चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका अण्णा द्रमुकचे सदस्य पी. ए. जोसेफ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली असून, त्याची सुनावणी न्यायमूर्ती वैद्यलिंगम यांच्या न्यायालयापुढे झाली. त्यावेळी न्या. वैद्यलिंगम यांनी वरील शंका उपस्थित केली. तसेच, याप्रकरणी पंतप्रधानांचे कार्यालय, केंद्र सरकार व तमिळनाडू सरकारला न्या. वैद्यलिंगम यांनी नोटीसही बजावली.

मृत्युची चौकशी केली जाणार..
जयललिता यांच्या मृत्यूबाबत माध्यमांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांचे निरसन झालेच पाहिजे, असे मतही न्या. वैद्यलिंगम यांनी व्यक्त केले. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्या डाओटवर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचीच बातमी बाहेर आली. त्यामुळे त्यांचे निधन कसे झाले, कशामुळे झाले, याचे पुरावे बाहेर आले पाहिजेत, असे मतही न्या. वैद्यलिंगम यांनी व्यक्त केले. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या तिघा निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण योग्य पीठापुढे मांडले जावे, असे न्या. वैद्यलिंगम यांनी स्पष्ट केले.

अण्णा द्रमुकची सूत्रे शशिकलांकडे!
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्‍वासू सहकारी व्ही. के. शशिकला यांची अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली. गेली तीन दशके हे पद जयललिता यांच्याकडे होते. अण्णा द्रमुकची सर्वसाधारण सभा गुरुवारी चेन्नईत झाली. विशेष म्हणजे, या सभेस शशिकला उपस्थित नव्हत्या. पक्षाच्या कार्यकारिणीचे दोन हजार सदस्य यावेळी उपस्थित होते. पक्षाच्या सुमारे 23 नेत्यांनी शशिकला यांच्या निवडीबाबतचे प्रस्ताव सादर केले होते. सर्वसाधारण सभेने एकमताने याबाबत पक्षाने मांडलेला प्रस्ताव संमत करण्यात आला. अण्णाद्रमुकमधील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते. त्यामुळे आता शशिकला यांच्याकडे अण्णा द्रमुकची धुरा असणार आहे.