जमिनीच्या वादातून सात गाड्यांची तोडफोड

0

गावात दोन महिला जखमी

वडगाव मावळ : जमिनीच्या वादातून पवनानगर (ता.मावळ) येथील ब्राह्मणोली गावात सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने धुडकूस घालत सात गाड्यांची तोडफोड केली तसेच घरांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी या युवकांना थांबविण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी वंदना शांताराम काळे यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिकेत कांताराम काळे, हनुमंत रामु काळे, सागर शांताराम काळे, बाबुराव शहाजी काळे, अक्षय कांताराम काळे यांच्यासह अनोळखी 15 जणांच्या विरोधात या मारहाण व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवनाधरणाच्या पायथ्याला असलेल्या ब्राह्मणोली गावातील शांताराम काळे यांच्या शेताच्या समोरुन वाहणार्‍या पवनानदीच्या काठावर गावातील काही मंडळींनी अनधिकृतपणे टेंन्ट लावत कॅम्प साईड तयार केली आहे. या कॅम्पसाईडकडे जाण्यास रस्ता नसल्याने शांताराम काळे यांची वहिवाट असलेल्या भातशेतीमधून रस्ता बनविण्यात आला आहे. दोन्ही जागा या पाटबंधारे विभागाच्या आहेत मात्र केवळ वहिवाट असल्याने दोघेही जागेवर हक्क सांगत आहेत. यावरुन ही हाणामारी झाली. या हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या असून सात वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वरील पाचजण व त्यांचे 15 अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून लोणावळा ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहे.