जनाधारचे गटनेता पगारे यांच्या शववाहिनीची तोडफोड

0

भुसावळ । जनाधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे यांनी समाजसेवेसाठी अर्पण केलेल्या शववाहिनीची अज्ञात टवाळखोरांनी तोडफोड केल्याची घटना शनिवार 14 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलीस स्थानकात अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घ्यावा
पगारे यांनी स्वखर्चातून शववाहिनी लोकार्पण केली आहे. ही शववाहिनी नेहमीप्रमाणेे गांधी पुतळ्याजवळील आरएमएस कॉलनीजवळ दारुबंदी कार्यालयासमोर उभी करण्यात आली होती. रात्रीच्या वेळेेस काही अज्ञात टवाळखोरांनी या शववाहिनीच्या समोरील काचाला मोठा दगड मारुन काचा फोडल्या आहे. त्याचप्रमाणे चालकाच्या बाजुनेदेखील काचा फोडण्यात आल्या आहे. यामुळे शववाहिनीचे नुकसान झाले असून शहरात दहशत पसरविण्याचे काम एका अज्ञात व्यक्तिने केले असून या भ्याड हल्ल्याला कधीही भीक घालणार नाही व जनसेवा अशीच सुरु ठेवणार, अशी प्रतिक्रिया गटनेता उल्हास पगारे यांनी दिली आहे. दरम्यान, याच परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला असून ही गाडी सुध्दा याच कॅमेर्‍याच्या नियंत्रणात असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित टवाळखोरांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणीदेखील गटनेता उल्हास पगारे यांनी केली आहे.