Private Advt

जनसेवा फाउंडेशनच्या गोशाळेच्यावतीने अंत्यसंस्काराचा अनोखा उपक्रम

जनतेच्या सहकार्याने पर्यावरणपूरक अंतिम संस्कार

बोरद। अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशनतर्फे पर्यावरणाचे रक्षण व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेत गायीच्या शेणापासून निर्मित गोवरी तसेच गायीचे तूप, निसर्गनिर्मित कापूरच्या सहाय्याने पर्यावरणाचे रक्षण होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फाउंडेशनच्या गोशाळेच्यावतीने अंत्यसंस्काराचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. मिळालेल्या निधीपासून गायीचा चारा उपलब्ध करण्यात येतो. जनतेच्या सहकार्याने पर्यावरणपूरक अंतिम संस्कार करीत असल्याचे जनसेवा फाउंडेशनचे प्रा.डॉ. अरुण कोचर, नानाभाऊ धनगर, सुयोग धनगर यांनी सांगितले.

फाउंडेशनतर्फे या कार्यासाठी अल्पनिधी घेतला जातो. त्या निधीचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारसाठी लाकडाऐवजी शेणापासूननिर्मित गोवरीचा पुरवठा केला. जाळण्यासाठी मदत व्हावी म्हणून गायीचे शुद्ध तूप व कपूरही दिला जातो. तसेच वाजंत्री व स्मशानभूमीत अंत्यसंस्कार असलेल्या जागेला रांगोळीच्या माध्यमातून सजविले जाते. अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत याठिकाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते थांबून योग्य रीतीने हा विधी पार पाडला जातो. लाकडाचा वापर याठिकाणी टळत असल्याने निसर्गाचाही समतोल राखला जातो. मिळालेल्या निधीतून गोमातेचे रक्षणासाठी सहकार्य मिळते. या उद्देशाने पर्यावरणपूरक अंतिम संस्कार केला जातो. अमळनेर येथील गोशाळेचे कार्य ३० वर्षापासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षापासून पर्यावरण पूरक अंतिम संस्कार शाळेच्यावतीने सुरू करण्यात आहे.

बोरदवासियांकडून कौतुक
बोरद येथील माजी सरपंच भीमसिंग राजपूत यांच्या मातोश्री कोंदबाई राजपूत यांच्या निधनासमयी बोरद येथे प्रथमच उपक्रमाला आले होते. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही माहिती मिळाली. हा उपक्रम यशस्वी झाल्याने बोरद येथील घनश्याम पाटील यांच्या मातोश्री कलाबाई पाटील व राजू उत्तम राजपूत यांच्या निधनप्रसंगी शेणापासून तयार केलेल्या गोवरीच्या सहाय्याने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे बोरदवासियांनी त्यांचे कौतुक केले आहे.