Private Advt

जनशक्ती विशेष : खडसेंमुळे डॉ. सतीश पाटील अन् देवकरांचे गळ्यात गळे

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची निवडणूक कालच पार पडली. सहज सोपी असणारी ही निवड प्रक्रिया तणाव अन् नाराजी नाट्यातच पार पडली. एकाच पक्षात राहुन एकमेकांना पाण्यात पाहणारे गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील हे काल निव्वळ खडसेंमुळे एक झाल्याचे दिसून आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्विकारली. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे चेअरमन कोण होणार याविषयी चर्चा करण्याबाबत फारशी जागाच उरली नव्हती. संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 21 पैकी 20 जागा निवडुन आल्या. त्यात 11 संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडुन आले. त्यामुळे चेअरमन राष्ट्रवादीचाच बसणार हे निश्‍चित झाले. देवकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र  चेअरमन आणि व्हा. चेअरमनपदासाठी ज्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चेअरमनपदासाठी आमच्या पक्षाचे सर्व 11 संचालक इच्छुक असुन निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला असल्याचा बॉम्बस्फोट केला. आणि इथुनच गुलाबराव देवकरांचे टेंशन वाढले. खडसेंनी फेकलेला इच्छुक उमेदवारांचा पत्ता हा राष्ट्रवादीसाठी धक्काच ठरला. खडसे चेअरमनपदासाठी कुणाचे नाव निश्‍चित करणार? असा प्रश्न गुलाबराव देवकरांसह राष्ट्रवादीच्या संचालकांना पडला. दुसर्‍या दिवशी म्हणजेच चेअरमनपदाच्या निवडीच्या दिवशी सकाळी राष्ट्रवादीच्या संचालकांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचे नाव पुन्हा समोर आले आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांच्या कपाळाला आढ्या पडल्या. आता या नावाला नकार कसा द्यायचा हे देखिल राष्ट्रवादीच्या इतर संचालकांना उमगत नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत हा विषय गेला आणि चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. तोपर्यंत जिल्हा स्तरावर माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील हे देवकरांच्या निवासस्थानी पोहोचले आणि अनेकांना आश्‍चर्याचा धक्का दिला. पक्षात राहुन एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी न सोडणारे डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचे एकत्र दिसणे हा ‘अजुबा’च म्हणावा लागेल. डॉ. सतीश पाटील यांनी ‘मी तुमच्या पाठीशी आहे’ असे म्हणत देवकरांना साथ दिली. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षात ज्येष्ठ नेते असले तरी डॉ. सतीश पाटील यांचे देखिल पक्षात वजन असल्याचे त्यांच्याकडुन दुर्लक्षीत झाले. त्यामुळेच देवकरांच्या पाठीशी डॉ. सतीश पाटील हा खमक्या नेता उभा राहीला आणि देवकरांच्या चेअरमनपदाचा मार्ग मोकळा झाला. एव्हाना एकमेकांना चिमटे घेत राजकीय वार करण्याची एकही संधी न सोडणारे डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकरांचे निव्वळ आणि निव्वळ खडसेंमुळेच गळ्यात गळे पडले.