जनतेने सलोख्याचे वातावरण ठेवावे

धरणगाव । सर्व जाती, धर्माच्या लोकांनी आपापसात समन्वय ठेवून सलोख्याचे वातावरण ठेवावे. तसेच धरणगाव शहरासह परिसरात शांततेचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन धरणगावचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी केले. धरणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.

 

त्रिपुरा राज्यातील घडलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यात अफवांना ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची धरणगावात बैठक आयोजित केली होती. बैठकीत मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक शंकर शेळके, तहसीलदार नितीन देवरे, रा.काँ.चे ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, कडू महाजन, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शिरीष बयस, भानुदास विसावे यांची उपस्थिती होती.

 

परिसरात शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करून शहरात व परिसरात शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपच्या ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, अ‍ॅड. वसंत भोलाणे, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, दीपक वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांनी मानले. बैठकीला शांतता समितीच्या सदस्यांसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.