Private Advt

जडी-बुटीचे औषध देण्याच्या नावाखाली तरुणाला सव्वा दोन लाखांचा गंडा : भुसावळातील आरोपी अखेर जाळ्यात

भडगाव : आजारातून बरे होण्यासाठी जडी-बुटीचे औषध देण्याच्या बहाणा करीत दोन लाख 13 हजारांची फसवणूक करणार्‍या एका संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अधिक कारवाईसाठी आरोपीला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरजसिंग राजूसिंग चितोडीया (रा.केसरनगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

उपचाराच्या नावाखाली तरुणाची फसवणूक
सुनील मडकू पाटील (44, रा.पारोळा) कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांनी किरकोळ आजार होता. आजारापासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे एका रस्त्यावर औषधांचा विना परवाना कॅम्प लावणार्‍या संशयीत आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया (रा. केसरनगर, भुसावळ) याला भेटून औषधांबाबत विचारणा केली. आपल्याकडे चांगल्या पध्दतीने औषध असल्याचे सांगितल्याने बोगस जडीबुटी देवून सुनील पाटील यांच्याकडून वेळोवळी पैसे घेतले. फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर औषध घेणे बंद करण्यात आले.

अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेलिंग
औषधी बंद करण्यात आल्यानंतर संशयीत आरोपीने अश्लिल फोटो पाठवून धमकी देत आणखी एक लाख 65 हजारांची मागणी केली. या प्रकाराला कंटाळून सुनील पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयीतआरोपी हा भुसावळ शहरात असल्याचे गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर पथकाने आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया (रा.केसरनगर, भुसावळ) याला अटक केली. आरोपीला अधिक कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.