छेडखानी करणार्‍या पूर्णानंद महाराजाची कोठडीत रवानगी

फैजपूर : प्रवचनकार म्हणून ख्याती असलेल्या व बर्‍यापैकी भक्तगण जमवलेल्या शहरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी असलेल्या पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराजाने एका अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याने पोलिसांनी त्यास कारागृहात टाकले. आरोपीस बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

छेडखानी करताच दिला चोप
झाले असे की, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पूर्णानंद महाराज नामक विवाहित व्यक्तीने मंगळवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या दुचाकीच्या विक्रीबाबत संशयीत गेल्यानंतर त्याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडीतेने याबाबत विकृत महाराजांच्या कृत्याची कुटुंबियांना माहिती देताच त्यास चांगलेच चोपून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून संशयीताविरोधात भुसावळ येथील महिला पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रात्री उशीरा याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पूर्णानंद पाटील उर्फ पूर्णानंद महाराज हा परीसरात प्रवचनकार म्हणून ख्यात आहे.याचे बर्‍याच पैकी भक्तगण आहेत. त्याने प्रेमविवाह केला असून आधीदेखील तो वादाच्या भोवर्‍यात सापडला होता व यापूर्वीदेखील याच प्रकारची काही प्रकरणे उघडकीस आली होती मात्र काही मान्यवरांच्या मध्यस्थीने तो गोत्यात आला नाही. मात्र अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व चेतन महाजन करीत आहेत.

धार्मिक क्षेत्रात काळीमा फासणारी घटना
पूर्णानंद नावातच आनंद असल्याने या पिसाळलेल्या महाराजांच्या सानिध्यात अनेक भक्तगण आहे. या भक्तांनी महराजांवर विश्वास टाकत अनेकांनी याला गुरू देखील केले मात्र भक्तांच्या विश्वासावर महाराजाने पाणी फिरवले आहे.