छेडखानी करणार्‍यांना ठोकून काढा

0

धुळे । आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेल्या आ. अनिल गोटे यांनी महिलांना जबरदस्त सल्ला देऊन पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. माता भगिनीनों, दंडुके काढा! छेडखानी करणार्यांना ठोकून काढा असा सल्ला आ. अनिल गोटे यांनी दिला आहे. घरामधल्या माता भगिनी आणि महिलांच्या अब्रुचे रक्षण करणे कायद्याच्या कुठल्याही कलमात गुन्हा ठरत नाही. त्यामुळे महिलांनी स्वत: बांबु गल्लीतून साडे तीन फुटांचे भरीव बांबुचे नवीन दंडुके घरी न्यावेत. जो कोणी आपल्या गल्लीत येवून, आपल्या घरासमोर येवून वेडे वाकडे अश्‍लिल हावभाव करेल अशा समाजकंटकाला मजबूत ठोकून काढा, ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असेही आ.गोटे यांनी म्हटले आहे.

पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

गोटे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जनतेच्या जीवीताची, मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेली पोलिस यंत्रणा गुंडाविरुध्द कारवाई न करता तक्रारदारांनाच अटक करुन, त्यांना त्रास देवून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप आ.गोटे यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ.गोटे यांनी म्हटले आहे की, धुळे शहरातील पोलिस यंत्रणा चैतन्यहिन झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात महिलांची, माताभगिनींचे छेडछाड करण्याचे उद्योग टुक्कार आणि आई- बापांच्या नियंत्रणात नसलेली मुले करीत आहेत.

तक्रारदारांनाच त्रास देण्याचा उद्योग

गोटे यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. कुमानगर परिसरातील सुमारे 100 ते 125 नागरिकांनी याबाबतच्या गंभिर स्वरुपाच्या लेखी तक्रारी केल्या आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे पोलिस यंत्रणेने गुंडाविरुध्द कारवाई करायचे सोडून तक्रारदारांनाच अटक करुन त्यांना त्रास देण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे आपल्याला भेटायला आलेल्या शिष्टमंडळाला स्वच्छ शब्दात सांगितले की, घरातील माय-माऊल्यांनी आता दंडुके ठेवावेत. जो कोणी, छेडखानी करत असेल, त्याला मजबूत ठोकून काढावे. साक्रीरोडच्या कुमारनगर या सिंधी समाज बहुल वस्तीत ज्यांचे घर नाही, व्यवसाय नाही, काही देणे घेणे नाही अशी गुंड टुक्कार मुले तेथे जातात तरी कशासाठी? याचा विचार पोलिस यंत्रणेने न करता जे तक्रारदार आहे त्यांनाच त्रास देणे सुरु केले आहे.

शहराची नितिमत्ता वेशीला!

धुळे शहरातील काही भ्रष्ट पोलिस अधिकारी अशा गुन्ह्यांना धार्मिक रंग देवून अथवा जातीय रंग देवून सिंधी बांधवांवर दबाव आणतात पण ज्यांचा दुरान्वयाने कुमारनगरशी संबंध नाही असे टुक्कार तरुण मोटरसायकलीवर 3-3 / 4-4 जण बसून कुमार नगरात फिरतात कशाला. याचा विचार पोलिस यंत्रणा का करत नाही? त्यामुळे आपण हे प्रकरण आपण पुढील आठवड्यात नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस महासंचालकांपुढे मांडणार असल्याचेही गोटे यांनी म्हटले आहे. पैशांसाठी शहराची नितिमत्ता वेशीला टांगणे हे अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा आ.गोटे यांनी दिला आहे.