छावा मराठा संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा

0

निवडणुकीपुर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे

नवी सांगवी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. परंतु भाजप-शिवसेनेकडे आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन वेळ मारून नेली जात आहे. निवडणुकीपुर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा सत्ताधार्‍यांना परिणाम भोगावे लागतील. मराठा समाजला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा छावा मराठा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी भाजप-सेनेने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

आचारसंहितेपुर्वी मान्यता हवी

राम जाधव यांनी सांगितले की, मराठा समाजाला आज खर्‍या अर्थाने आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाज पिढ्यान्पिढ्या शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील कोणत्याही नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. 90 टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आपल्या जातीसाठी कोणत्याही नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अधिवेशनापूर्वीच आरक्षणावर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.

सत्ताधार्‍यांना जागा दाखवू

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी सर्व समाजाने दबाव आणल्याशिवाय आरक्षण मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ते न मिळाल्यास राज्यातील मराठा समाज वेळप्रसंगी सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राम जाधव यांनी दिला आहे.

Copy