छायाचित्र प्रदर्शनीत सावदा शहरामधील कामांवर प्रकाशझोत

0

सावदा । पालिका प्रशासनातर्फे नगरविकास सप्ताह राबविला जात आहे. या सप्ताहांतर्गत विकासकामांवर छायाचित्र प्रदर्शनी आणि महिला बचत गटांचे चर्चासत्र झाले. प्रदर्शनीत 36 छायाचित्रांद्वारे शहरात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पालिका सभागृहात आयोजित छायाचित्र प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी त्यांचे मनातील सावदा शहर या विषयावर काढलले चित्र या प्रदर्शनीचे उद्घाटन नगराध्यक्षा अनीता येवले यांचेहस्ते करण्यात आले.

उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, गट नेते अजय भारंबे, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेवक उपस्थित होते. यानंतर लगेच पालिकेच्या पूरक इमारतीमधील सभागृहात राज्य उपजीविका अभियानांतर्गत असलेल्या महिला बचत गटाचे चर्चासत्र झाले. मुख्याधिकारी बागुल यांनी मार्गदर्शन केले. महिलांनीदेखील येणार्‍या अडचणींचा ऊहापोह केला. प्रदर्शनात शहरात झालेल्या विकासकामांची 36 छायाचित्रे तसेच आ.गं. हायस्कूल नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिरातील एकूण 11 विद्यार्थ्यांनी संकल्पनेतील सावदा शहर या विषयावर काढलेली चित्रे लावली आहेत. त्यात विद्यार्थ्यांनी शहरात क्रीडांगण, सार्वजनिक रुग्णालय, स्वच्छ सुंदर रस्ते, बगीचे, उड्डाणपूल या बाबी दर्शवल्या आहेत..