छत्रपती संभाजी मालिकेतील कलावंतांशी साधला मुक्त संवाद

0

दिशा फाऊंडेशनने राबविला उपक्रम
पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल, आकर्षण आणि प्रचंड अभिमान होता. संभाजी महाराजांची भूमिका साकारायची हे महाविद्यालयापासूनचे स्वप्न होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत हे स्वप्न पूर्णत्वाला आले आहे. त्या अडचणींचे कोणतेही भांडवल करायचे नाही. या विषयासाठी पूर्णपणे वाहून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र निधड्या छातीच्या संभाजी महाराजांना त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला की काय असा प्रश्‍न मनात येतो, असे प्रतिपादन अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. दिशा सोशल फाउंडेशनच्यावतीने आहेर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीच्या माध्यमातून शिवाजी महाराज फेम शंतनु मोघे, संभाजी महाराज फेम डॉ.अमोल कोल्हे, झी वाहिनीच्या वरिष्ठ कार्यकारी निर्मात्या सोजल सावंत, मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्याशी मुक्त संवाद साधला.

मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शाम लांडे, समीर मासुळकर, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, करुणा चिंचवडे, विक्रांत लांडे, अमित गावडे, मोरेश्‍वर शेंडगे, राजु बनसोडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले, महिला काँग्रेस शहराध्यशा गिरिजा कुदळे, दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजु गोलांडे, राजु दुर्गे, जितेंद्र ननावरे, दत्ता पवळे, धनंजय काळभोर, उर्मिला काळभोर, बाळासाहेब मोरे, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अण्णासाहेब मगर बँक संस्थापक बाळासाहेब गव्हाणे, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष एस.बी.चांडक आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न मी पाहिले होते. त्याची दोन कारणे आहेत. प्रथमतः महाविद्यालयात असताना विश्‍वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी माझ्या वाचनात आली. त्यामुळे मी भारावून गेलो आणि दुसरे म्हणजे डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकतील भूमिका. ते पाहून संभाजी महाराज अधिकच जवळचे वाटू लागले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला असे मला वाटते. सुरुवातीला नितीन देसाई यांच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती मालिकेत शिवाजी महाराज यांची भूमिका साकारायला मिळाली. शंभूराजे नाटकातून संभाजी साकारत होतोच. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या आहेत. छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारायची ही खुणगाठ मनाशी पक्की होतीच.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही अठरा महिने रयतेने लढा दिला, तो राजा असामान्यच होता. आज या मालिकेच्या माध्यमातून संभाजी राजांचा खरा इतिहास आम्ही मांडत आहोत. जगभरात सोळा कोटी लोक ही मालिका पाहत आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः ही मालिका डोक्यावर घेतली आहे. सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्यावर अनेक मतप्रवाह व्यक्त होत असतात. सर्वाना आपलेसे वाटेल, पटेल आणि रुचेल अशा पध्दतीने आम्ही उपलब्ध पुराव्याच्या आधारे मालिकेची मांडणी केली आहे. झी वाहिनीने दाखविलेले धाडस, कलाकारांनी साकारलेल्या भूमिका, मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतलेले कष्ट आणि प्रेक्षकांनी दिललेला प्रतिसाद यामुळेच आम्ही संभाजी महाराज जांचा जाज्वल्य आणि खरा इतिहास सर्वापर्यत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय.

भूमिका साकारण्याचे दडपण
शिवाजी महाराज साकारणारे शंतनु मोघे म्हणाले की, राजा शिवछत्रपती या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवली आहे. अमोल आणि मी खूपदा एकत्र काम केलेलं असल्याने त्यांच्यासमोरच शिवाजी महाराज साकारताना मला दडपण कधी आलं नाही. या भूमिकेला न्याय देऊ शकलो, याचे समाधान आहे. सोजल सावंत म्हणाल्या की, झी वाहिनीने आजपर्यंत मालिकांची निवड करताना मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचे महत्त्व आणि सामाजिक भान जपले आहे. छत्रपती संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कार्तिक केंढे म्हणाले की, या मालिकेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच आमचा उत्साह अधिक वाढला आहे. रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आशीर्वाद हिच आम्हा सर्वांसाठी उर्जा आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवाशाहीर हेरंब पायगुडे यांच्या पोवाडा गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. आभार डॉ.शाम अहिरराव यांनी मानले.

Copy