चौथ्या रेल्वे लाईनसाठी जमीन अधिग्रहीत केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना अनुकंपावर रेल्वेत नोकरी द्या : खासदार रक्षा खडसे

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ-जळगाव दरम्यान अंथरण्यात आलेल्या चौथ्या रेल्वेलाईनसाठी जळगावसह भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांची जमीन रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहीत करण्यात आली. जमीन अधिग्रहीत झालेल्या शेतकर्‍यांच्या परीवारातील मुलांना रेल्वेत अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत गुरुवारी केली.

‘त्या’ निर्णयामुळे मोठे नुकसान
लोकसभेत खासदार खडसे म्हणाल्या की, रेल्वे विभागामार्फत 11 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात आलेल्या अधिनियमानुसार रेल्वेद्वारे अधिग्रहित केलेल्या जमिनी मोबदल्यात यापासून पुढे रेल्वेद्वारे नोकरी देण्यात येणार नाही व देण्यात येणारा मोबदला सुद्धा कमी देण्यात येईल मात्र या निर्णयामुळे अनुकंपग्रस्त नागरीकांचे नुकसान होणार आहे. ही अधिसूचना काढल्यापासून आधीच रेल्वेद्वारे जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना रेल्वेमध्ये नोकरी देऊन समाविष्ट करावे. जबलपूर मंडळ अंतर्गत रीवा-सिधी-सिंगरोली तथा सतना-पन्ना नवीन रेल्वे लाईनसाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणातील शेतकर्‍यांच्या परीवारातील सदस्यांना अलिकडेच सन 2021 मध्ये नोकरी देण्यात आल्याने भुसावळ-जळगाव चौथ्या रेल्वे लाईनसाठी अधिग्रहण हे 2017 चे असल्याने व रेल्वेची अधिसूचना ही नोव्हेंबर 2019 असल्याने त्याच आधारावर या शेतकर्‍यांच्या परीवारातील सदस्यांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करण्यात आली.