Private Advt

चोरीस गेलेले दागिने परत करून चाळीसगावातील पोलिसांनी फुलवला आनंद

चाळीसगाव : रीक्षा प्रवासात दागिण्यांची चोरी झाल्यानंतर हताश झालेल्या विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली. यंत्रणेने अलर्ट होवून तपासचक्रे गतिमान करीत आरोपींच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडून ऐवज जप्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल नगरच्या महिलेला बुधवारी परत करण्यात आला. पोलिसांच्या चमकदार कामगिरीनंतर महिलेच्या चेहर्‍यावरही आनंद फुलला.

रीक्षातून लांबवला ऐवज
अंकिता प्रतीक पाटील (25, रा.पोलिस क्वाटर, अहमदनगर) या त्यांच्या आई सोबत मालेगाव होऊन चाळीसगाव येथे शहरात 27 जानेवारी लग्नासाठी आल्या असता रीक्षातून हिरापूर जाताना चोरट्यांनी कपड्याच्या बॅगेतून 5 लाख 32 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी गुन्हा दाखल होताच तपासचक्रे फिरली. चौघा चोरट्यांना 3 फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत 27 हजार 500 रुपये रोख आणि पाच लाख 84 हजार 700 रुपये किंमतीचा 13 तोळ्याची सोन्याची लगड मिळून एकूण सहा लाख 12 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार सोन्याच दागिने मूळ फिर्यादी अंकिता पाटील यांना बुधवारी देण्यात आले. चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.