चोरीच्या 13 दुचाकीसह तिघे चोरटे शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : नंबर प्लेट बदलून दुचाकींची विक्री

शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी दुचाकींची चोरी करणार्‍या तिघा भामट्यांच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 13 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. रमेश साहेबराव पावरा (महादेव दोंडवाडा, ता.शिरपूर, जि.धुळे), प्रवीण मगन पावरा (महादेव दोंडवाडा, ता.शिरपूर, जि.धुळे) व विक्रम शिवाजी पावरा (बोमल्यापाडा, ता.शिरपूर, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गस्तीदरम्यान चोरटा अडकला जाळ्यात
रविवार, 5 रोजी रात्री शिरपूर पोलीस गस्तीवर असताना संशयीत रमेश साहेबराव पावरा यास पोलिसांना अडवल्यानंतर त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची कबुली संशयीताने दिली होती. आरोपीने साथीदार प्रवीण पावरा व विक्रम पावरा यांच्यासोबत शिरपूर शहर, थाळनेर व धुळे जिल्ह्यातील तसेच चोपडा अमळनेर, जळगाव, शहादा व नंदुरबार आदी भागातून 13 दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी दुचाकींची नंबरप्लेट बदलून त्या कमी किंमतीत विक्री केल्याची बाब पुढे आली आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस नाईक पंकज पाटील, नरेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही.एस अखडमल, मुकेश पावरा, गोविंद कोळी, भटू साळुंके, आकाश साळुंखे, अमित रानमाळे, स्वप्नील बांगर, प्रवीण गोसावी आदींच्या पथकाने केली. गुन्ह्याच्या पुढील तपास पंकज पाटील करीत आहेत.

Copy