चोरीच्या चार दुचाकींसह दुचाकी चोरटे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

बाजारपेठ गुन्हे शाखेची कामगिरी : चोरीच्या चार दुचाकी जप्त : आरोपींचा ताबा अधिक तपासार्थ एमआयडीसी पोलिसांकडे

भुसावळ : दोन अट्टल दुचाकी चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपींनी एमआयडीसी जळगाव, फैजपूर, चोपडा हद्दीतून चोरलेल्या 83 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा (19, गांधी नगर, भुसावळ) व निखील जितेंद्र ठाकरे (21, नारायण नगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना अधिक तपासार्थ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी कारवाईचे आदेश दिले होते. बाजारपेठ गुन्हे शाखेने निक्की मिश्रा व निखील ठाकरे यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. आरोपींच्या ताब्यातून जळगाव एमआयडीसी हद्दीतील दोन तसेच फैजपूर व चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीतून लांबवण्यात आलेली प्रत्येकी एक दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींना अधिक तपासार्थ जळगाव एमआयडीचे एएसआय आनंदसिंग पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार रवींद्र बिर्‍हाडे, नाईक विकास सातदिवे, नाईक उमाकांत पाटील, नाईक निलेश चौधरी, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, योगेश माळी आदींच्या पथकाने केली.