Private Advt

चोरीच्या आठ दुचाकींसह दुचाकी चोरट्यांची टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दुचाकी चोरीनंतर स्वस्तात विक्री करताना चोरटे अडकले जाळ्यात : जिल्हाभरात वाहनांची चोरी

धुळे/शिरपूर : दुचाकी चोरीनंतर चोरटे अल्प दरात दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर गोपाल भाईदास शिरसाठ (पिळोदे, ता.शिरपूर) याच्या शिरपूर फाटा भागातून मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीताने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर अन्य तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी राकेश संजय कोळी (रा.टेकवाडे, ता.शिरपूर), गणेश सीताराम पवार व राजा कपुरदास बैरागी (दोन्ही रा.आमोदे, ता.शिरपूर) यांना अटक करण्यात आली. आरोपींना अधिक तपासासाठी धुळ्यातील आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या भागातून चोरल्या दुचाकी
चोरट्यांनी धुळ्यातील आझादनगर, साक्री ठाणे, अमळनेर पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक तर शहादा पोलीस ठाणे हद्दीतीन तीन तर सेंधवा पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी केली. जप्त दुचाकींमध्ये तीन होंडा शाईन, दोन ड्रीम युगा, एक सीडी डीलक्स, एक टीव्हीएस स्टार व एक युनिकॉन दुचाकीचा समावेश आहे.

यांच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, सुनील विंचूरकर, नाईक संतोष हिरे, नाईक मनोज पाटील, चेतन कंखरे, कॉन्स्टेबल किशोर पाटील, चालक कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.