चोरलेल्या चेकद्वारे 70 लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न

0

उद्योजकाची फसवणूक, भुसावळातून एक जण ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई

जळगाव: मुं बई येथून विदेशात कपडे निर्यात करणार्‍या कंपनीच्या उद्योजकाचे चेकबुक चोरून त्यातील प्रत्येकी 35 लाखप्रमाणे दोन चेक वटविण्याचा प्रयत्न मुंबईच्या पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी, मुंबईतील आझादनगर मैदान पोलीस ठाण्याचे पथक जळगावात धडकले. या पथकाने महेंद्र गणपत पाटील (वय 35, रा. भुसावळ) यास ताब्यात घेतले. याशिवाय आणखी दोन जणांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

आझादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार ज्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाले होते त्या पूर्वेश एंटरप्रायजेसच्या खातेधारकाला शोधून काढले. गुरुवारी, आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजेंद्र धुरत, पोलीस नाईक एन.पी.पुरी व पोलीस शिपाई संदीप मावळे यांचे पथक जळगावात दाखल झाले. पथकाने महावीर बँकेतून माहिती घेवून संशयित महेंद्र पाटील यास ताब्यात घेतले. या प्रकरणात पैसे जमा करण्यासाठी आणखी एकाच्या खात्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र, संबंधित तरुण उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने त्याच्यासह एकाला पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत पथकाने शहर पोलीस ठाणे गाठून नोंद केली आहे.

शक्कल लढविली मात्र, पोलिसांनी हाणून पाडली

70 लाख रुपये वळते करुन ते वळविण्याच्या प्रयत्नातील टोळीने एकाचवेळी 70 लाख रुपयांचा चेक न टाकता, 35 लाख रुपये याप्रमाणे दोन चेक खात्यात टाकले. 70 लाखांचा चेक टाकला असता, बँकेच्या नियमानुसार 70 लाख रुपये एवढी रक्कम एकाचवेळी खात्यातून वळवित असल्याने संबंधित खातेधारक खत्री यांना बँकेचा फोन गेला असता. त्यामुळे दोन वेगवेगळे चेक बनविण्यात येवून बनावट स्वाक्षरीच्या आधारावर ते महावीर बँकेच्या खात्यावर वळते करण्यात आले. मात्र, मुंबई पोलिसांनी गुन्हेगारांची शक्कल हाणून पाडली. खत्री यांचे ऑफिसमधून त्यांचे चेक कोणी चोरले? चेक जळगाव शहरातील पूर्वेश एंटरप्रायजेसच्या महावीर बँकेच्या खात्यावरच जमा करण्यात आले म्हणजे या गुन्ह्याचे मुंबई ते जळगाव कनेक्शन आहे का? याचाही शोध मुंबईच्या पथकाकडून घेतला
जात आहे.