चोरट्याला ठोठावली 7 वर्ष कारावासाची शिक्षा

0

जळगाव । धरणगाव शहरातील हेमइंदू नगरात 16 जानेवारी 2014 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून घरातील लोकांना मारहाण करून 59 हजारांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली होती. अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी मंगळवारी आरोपीला 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

धरणगाव येथील संदीपकुमार सुरेश देसले (वय 39) हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना 16 जानेवारी 2014 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक दरवाजा वाजायला लागला. त्यांना जाग आल्यावर 3 ते 4 तरूण दरवाजा तोडून घरात आले होते. त्यापैकी एकाच्या हातात सुरा तर इतरांच्या हतात काठ्या होत्या. त्यानंती मारहाण करून घरातील कपाटात ठेवलेले 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती पोलिसांनी चोरी प्रकरणी अटक केलेल्या प्रेमसिंग डोंगरसिंग आलावा (वय 40, रा. काकडावा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) याला 15 जानेवारी 2015 रोजी अमरावती जिल्हा न्यायालयाने 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानेच धरणगाव येथील चोरी केलेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणी न्यायाधीश पटणी यांच्या न्यायलयात खटला सुरू होता. त्यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, अ‍ॅड. नितीन देवराज यांनी 7 साक्षीदार तपासले.

1 हजार रुपयांचा दंड
धरणगाव येथील चोरी प्रकरणी प्रेमसिंग आलावा याला न्यायाधीश पटणी यांनी दोषी धरले. त्यात कलम 458 अन्वये 7 वर्ष कारावास, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरसल्यास 1 महिना साधी कैद तसेच कलम 380 अन्वये 7 वर्षे शिक्षा, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्याला एकत्रीत भोगायच्या आहेत. आरोपीतर्फे अ‍ॅड. सी. बी. लोहार यांनी कामकाज पाहिले. अमरावती न्यायालयाने प्रेमसिंग आलावा याला 15 जानेवारी 2015 रोजी 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा संपल्यानंतर त्याला धरणगाव चोरी प्रकरणी सुनावलेली 7 वर्षाची शिक्षा भोगायची आहे. त्यामुळे प्रेमसिंग याचा 2029 पर्यंत कारागृहात मुक्काम असणार आहे.