चोरट्यांचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात धुमाकुळ

0

जळगाव :गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्या होण्याच्या घटना कमी झाल्या होत्या परंतू नववर्षाच्या पुर्वसंध्येला शहरात एकाच दिवशी भरदिवसा दोन घरफोड्यांतून तब्बल 20 ते 22 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. यातील पहिली घटना सिंधी कॉलनी परिसरातील भगवती अपार्टमेंट येथे दुपारी 3.30वाजता, तर दुसरी घटना रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विद्यानगर भागात असलेल्या रूषी अपार्टमेंटमध्ये दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी भरदिवसा केल्या या दोन्ही घटनांमध्ये 20 ते 22 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तर घटनास्थळी पोलीसांनी पाहणी केली असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून एक प्रकारे थर्टी फस्टच साजरा केला असे म्हणता येईल.

पहिली घटना..
शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंधी कॉलनी परिसरात पहिली घटना घडली. रमेशलाल भोजराज तलरेजा हे सिंधी कॉलनी परिसरातील भगवती अपार्टमेंट मधील रूम नं. 12 येथे पत्नी सुनिता, मुलगा भारत व सुन अनुष्का यांच्यासोबत राहतात. रमेशलाल तलरेजा यांचे गोलाणी मार्केट येथे रमेश म्युझिक पॅलेस हे दुकान असून ते स्वत: व मुलगा भारत हे सांभाळतात. नेहमी प्रमाणे रमेशलाल हे मुलासोबत सकाळी दुकानात गेले. दरम्यान, सुन अनुष्का ही माहेरी गेली असल्याने त्यांच्या पत्नी सुनिता ह्या घरी एकट्याच होत्या. परंतू दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास सुनिता तलरेजा ह्या देखील अपार्टमेंटमधील काही महिलांसोबत मेहरूण येथे फिरण्यासाठी गेल्या. त्यामुळे घरात कुणी नसल्याचा अज्ञात चोरट्यांनी संधी साधत भर दुपारीच तलरेजा यांच्या घराचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाट फोडून रोकड व दागिने चोरून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी 4.30 वाजता नेहमी रमेशलाल तलरेजा हे घरी आल्यानंतर त्यांना घरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश करताच समोरच्या खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मधल्या खोलीत गेल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून सामान अस्ताव्यस्थ फेकल्याचे त्यांना दिसून आले. त्यांच्या पत्नी घरी आल्या. त्यांनाही घरफोडी झाल्याचे कळताच धक्का बसला. तलरेजा यांनी पाहणी केल्यानंतर अडीच लाखांची रोकड व 50 तोळे सोने असे एकूण 20 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले.

 जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी
घरफोडी झाल्यानंतर रमेशलाल तलरेजा यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलीसांची संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पीएसआय गिरधर निकम, पोलीस कर्मचारी भास्कर पाटील, नाना तायडे, अजित पाटील, योगेश ठाकूर, रवि नरवाडे हे घटनास्थळी काही वेळातच दाखल झाले. या पाठो-पाठ फॉरेन्सिक लॅब व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झाली होती. ठसे तज्ञ तसेच श्‍वान पथकाकाडून देखील घराची तपासणी करण्यात आली परंतू त्यांना काहीही हाती लागले नाही. जिल्हा पोलीस स्टेशनचे गिरधर निकम यांनी पाहणी केल्यानंतर तलरेजा यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.

वॉचमनच्या मुलावर संशय
भगवती अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून रामसिंग पवार कामाला असून ते पत्नी त्यांची तिन मुल, एक मुलगी सोबत अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहतात. घरफोडी झाल्यानंतर रमेशलाल तलरेजा यांनी रामसिंग यांना विचारपूस केली असता कोणी आले नसल्याचे पवार यांनी सांगितले. त्यातच रामसिंग यांचा मुलगा रामेश्‍वर घटना झाल्यापासून गायब असल्याने तलरेजा यांनी रामेश्‍वर यानेच घरफोडी केली असावी अशा संशय व्यक्त केला. एलीसीबी पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी करत वॉचमन रामसिंग यांची चौकशी केली. रामेश्‍वर हा कुठे गेला या विषयी विचारपूस केल्यावर रामसिंग यांनी बाहेर गेल्याचे सांगितले. पथकाने रामसिंग यांच्या तिन्ही मुलांची मोबाईल नंबर घेत त्यांची माहिती घेतली.

 वर्षभरापूर्वीही झाली होती घरफोडी
गेल्या वर्ष भरापूर्वी देखील भगवती अर्पामेंटमधील डॉ. सरला पितमणी यांच्या घरी देखील घरफोडी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून 5 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. यानंतर आज शनिवारी भरदिवसा चोरट्यांनी रमेशलाल तलरेजा यांच्या घरी डल्ला मारून 20 लाखांचा ऐवज लंपास केला. गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना कमी झाल्या होत्या परंतू चोरट्यांनी आज भरदिवसा घरफोड्या करत शहरात धुमाकुळ घातला. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरी घटना

घरफोडीची दुसरी घटना ही मानराज पार्कजवळील विद्यानगर येथे घडली. यात विद्या नगर येथे असलेल्या मुंदडा शाळे समोरील रूबी अपार्टमेट मधील प्लॅट न.3 मध्ये दिपक निंबा कोकंदे आपल्या कुटूबासह राहतात. 31 रोजी पत्नीसह बाजारात जायाचे असल्याने दुपारी 2 वाजेला राहत्या घराला कुलूप लावून बाजारात गेले. या दरम्यानात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून लंपास केला. बाजार करून दुपारी 4 वाजेला घरी परत आले असता अपार्टमेट मध्ये गेल्यानंतर प्लॉटला कुलूप दिसून आले नाही. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आला. कपाटातील समानाची झडती घेतली असता 9 हजार रूपये रोख, 1 ग्रॅम सोन्याची अंगठी 2800 रूपये किमतीची, 1500 रूपयाचे सोन्याचे मणी, 5 हजार रूपये किमतीचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल असा 18 हजार 300 रूपयांचा ऐवज घेवून पसार झाले. अज्ञात चोट्याविरूध्द रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.