Private Advt

चोपड्यात कुंटण खान्यावर मोठी कारवाई : परराज्यातील 23 तरुणींची सुटका

11 मालकिणींवर पीटा अ‍ॅक्टन्वये कारवाई ः महिलांची कोठडीत रवानगी

भुसावळ/चोपडा :  शहरातील नगरपालिकेच्या मागे सुरू असलेल्या कुंटण खान्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकत 23 तरुणंची सुटका केली तर वेश्या व्यवसाय चालवणार्‍या 11 महिलांविरोधात चोपडा शहर पोलिसात पीटा अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या 11 महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर पीडीत असलेल्या 23 तरुणींना जळगावच्या आशादीप वस्तीगृहात हलवण्यात आले आहे.

अचानक कारवाईने उडाली खळबळ
चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परीसरात अवैधरीत्या कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी, 22 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परीसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडण्यात आलेल्या नेपाळसह मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील 23 तरुणींची सुटका करण्यात आली. या तरुणींची रवानगी जळगावच्या आशादीप वस्तीगृहात करण्यात आली आहे तर वेश्या व्यवसाय चालवणार्‍या 11 मालकिणींविरोधात पीटा अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.