चोपड्याच्या नागपुरे बंधूंची चित्रे झळकणार दुबईत

0

चोपडा । येथील प्रताप विद्या मंदिरातील कलाशिक्षक स्व आनंदा बंडू नागपुरे (बारी) यांचा कलेचा वारसा पुढे नेतांना त्यांच्या दोन्ही कलावंत पुत्रांनी ’आनंद कलाक्षर’च्या माध्यमातून आता थेट दुबई गाठली आहे. चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील सी.बी.निकुंभ हायस्कूलचे कलाशिक्षक असलेले वसंत आनंदा नागपुरे व चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील कलाशिक्षक पंकज आनंदा नागपुरे हे 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दुबई येथील तीन दिवसीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. दुबईतील शेख खलीफा बिन झियाद रोडवरील अल् झबील पार्क मध्ये होणार्‍या ’उद्योग इंडिया’ या प्रदर्शनात दोघा बंधूंची चित्रे झळकणार आहेत.

200 कलावंतानी घेतला सहभाग
या प्रदर्शनात भारत, दुबई आणि दक्षिण आफ्रिकेतील एकूण 200 कलावंत सहभागी होणार असून सुमारे 20 हजार रसिक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या आधी दोघा बंधूंची मुंबई, पुणे, चोपडा येथे प्रदर्शने झाली असून रसिकांचा प्रतिसाद लाभला आहे. दोघांनाही कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पंकज नागपुरे अक्षर सुलेखन-कॉलीग्राफी प्रकारात चित्रकृती तयार करतात व अक्षरलेखनाचे वर्गही घेतात. तर वसंत नागपुरे हे अमूर्त तसेच वास्तववादी प्रकारात चित्रकृतीतून आपली कला सादर करतात व चित्रकलेचे मार्गदर्शन वर्गही घेतात.

Copy