Private Advt

चैत्र नवरात्रोत्सवाला आदिशक्ती मनुदेवी मंदिरात विधीवत सुरुवात

यावल : सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिरात शनिवारपासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. यानिमित्त चोपडा येथील आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे या दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सातपुडा निवासिनी मनुदेवीच्या मंदिरात चैत्र पाडव्यानिमित्ताने चैत्र नवरात्रोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. यापूर्वी सलग दोन वर्षे या उत्सवावर बंधने आली होती. त्यामुळे भाविक हिरमुसले होते. यंदा मात्र सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण
माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे या दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना झाली. मंदिर संस्थानने आजी-माजी आमदारांचा सत्कार केला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी यांची उपस्थिती होती. संपूर्ण धार्मिक विधी दगडू महाराजांनी पार पाडले. या कार्यक्रमासाठी मनुदेवी संस्थानचे व्यवस्थापक आर.के.पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील यांनी परिश्रम घेतले. उत्सवकाळात भाविकांची मोठी गर्दी होईल.

पौर्णिमेपर्यंत चालणार उत्सव, संस्थानकडून तयारी
दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सवाला चैत्र महिन्यापासून सुरूवात होते. घटस्थापना करून पौर्णिमेपर्यंत मंदिरावर यात्रोत्सव असतो. या उत्सवानिमित्त मंदिरावर नवस फेडण्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी मंदिर संस्थानने व्यवस्था केली आहे.