चेन्नईत अडकलेल्या १०६ उमेदवारांना स्वगृही आणण्यासाठी महापौरांचा पुढाकार

0

जळगाव– रेल्वे विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून चेन्नई येथे गेलेल्या महाराष्ट्रातील १०६ उमेदवारांचा कालावधी संपुष्टात आला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्याने ते सर्व त्याठिकाणी अडकून पडले आहे. जिल्ह्यातील ५३ विद्यार्थ्यांनी महापौर सौ.भारती कैलास सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्याने त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी व नोडल ऑफिसरला पत्र पाठविले आहे.

रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेले महाराष्ट्रातील १०६ उमेदवार चेन्नई येथील पेरंपूर अँड कॅरेज वर्क्स येथे गेलेले होते. त्यात जळगाव शहरातील २२ तर जिल्ह्यातील ५३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते सर्व त्याठिकाणी अडकले आहेत.

उमेदवारांनी महापौरांशी केला संपर्क
चेन्नई येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कालावधी पूर्ण केल्यानंतर सर्व उमेदवार स्वगृही परतणार होते परंतु लॉकडाऊनमुळे देशातील सर्व दळणवळण व्यवस्था ठप्प झाल्याने ते त्याठिकाणीच अडकले. २१ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर घरी परतण्याची आशा लावून असलेल्या उमेदवारांची आशा लॉकडाऊन वाढल्याने मावळली. घरी येण्यासाठी काहीही सोय नसल्याने व सध्या हाल होत असल्याने जळगावातील उमेदवारांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे मदतीसाठी संपर्क केला.

महापौरांनी तात्काळ घेतली दखल
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी उमेदवारांच्या विनंतीची तात्काळ दखल घेतली. सर्व उमेदवारांच्या सविस्तर तपशीलाची यादी मागवून त्यांचे जीपीएस लोकेशन देखील त्यांनी मागविले. सर्व यादी अद्यावयत करून महापौरांनी त्या उमेदवारांना स्वगृही आणण्याची व्यवस्था करावी यासाठी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, नोडल ऑफिसर किरण सावंत यांना मेलद्वारे पत्र पाठविले. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी फोनद्वारे याबाबत खा.उन्मेष पाटील यांच्याशी देखील चर्चा केली आहे.