चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बांगलादेशात भारत-पाकमध्ये लढत

0

नवी दिल्ली : भारत – पाकिस्तान संघात बऱ्याच कालावधीनंतर सामना होणार आहे. हा सामना जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बांगलादेशात होणार आहे. बांगलादेशात १५ ते २६ मार्चदरम्यान इमर्जिंग चषक स्पर्धा रंगणार आहे. भारत-पाकिस्तानशिवाय आशियाई देशांतील संघांचाही या स्पर्धेत सहभाग आहे. इमर्जिंग चषक स्पर्धा यापूर्वी २०१३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मागील वेळी २३ वर्षांखालील खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून आयोजित करण्यात येते.

नियमांत केले महत्त्वाचे बदल

या वर्षीच्या स्पर्धेसाठी आयोजकांकडून नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या संघात २३ वर्षांवरील ४ खेळाडूंचा संघात समावेश करता येईल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाची किमान एकदा तरी प्रत्येक संघाशी लढत होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीसाठी ‘नॉकआऊट’ फेरी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ इमर्जिंग चषक स्पर्धेत नक्कीच सहभागी होईल. कारण भारत-पाकिस्तान या दोन संघांतील ही मालिका नाही. ही स्पर्धा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत नक्कीच भाग घेईल, असे बीसीसीआयचे अधिकारी एम. व्ही. श्रीधर यांनी सांगितले.

अंडर १९ मधील खेळाडूंचा समावेश

कॅप्टन कोहलीचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही याचवेळी ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे कोहलीच्या संघातील २३ वर्षांवरील चार खेळाडू इमर्जिंग स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. भारताचा अंडर-१९ संघही सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे याच संघातून अधिकाधिक खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इमर्जिंग चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, यूएई, हाँगकाँग, आणि नेपाळचा अंडर -२३ संघ सहभागी होईल.