चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगत वाढली

0

नवी दिल्ली । जून महिन्यात होणार्‍या आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सहभागी होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर स्पर्धेची रंगत आतापासूनच वाढायला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसाठी आतापासूनच शाब्दिक ताशेरे उडवले जाऊ लागले आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून इंजमाम उल हकने यंदा पाकिस्तानचा संघ भारताला लोळवणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करून वातावरण तापवण्याचे काम केले आहे तर भारताचा अनुभवी फलंदाज युवराज सिंग संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे युवराजने म्हटले. गतविजेतेपद कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे सांगितले आहे.

भारताला लोळवणारच: इंजमाम
सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आतापासूनच भारत विरुद्ध पाकिस्तान या रोमांचक लढतीकडे लागले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा पाक निवड समितीचा मुख्य इंजमाम उल हकने यंदा पाकिस्तानचा संघ भारताला लोळवणारच, असा विश्वास व्यक्त करून वातावरण तापविले आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी आजवर चांगली राहिली नसली तरी प्रत्येक दिवस हा नवा असतो. यावेळी आमचे खेळाडू नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून भारताला पराभूत करतील असा विश्वास आहे, असे इंजमाम म्हणाला. 2004 साली एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती. त्यानंतर 2009 मध्ये सेंच्युरिअन येथे पाकने भारतावर विजय प्राप्त केला होता. विशेष म्हणजे, यंदाही भारत-पाकिस्तान सामना एजबस्टन स्टेडियमवर होणार आहे.

स्पर्धेचा विजेता भारतच- युवराज
18 जून रोजी भारतीय संघ या स्पर्धेचा विजेता म्हणून पाहायला मिळेल असा विश्वास युवराजने व्यक्त केला. स्पर्धेचे जेतेपद भारताकडे कायम राहण्यासाठीच्या योजनांबाबत बोलताना युवराज म्हणाला की, भारतीय संघाला स्पर्धेत कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. पण मायदेशातील यशस्वी मालिकेनंतर संघ नक्कीच कामगिरी करेल. स्पर्धा जिंकून जेतेपद कायम ठेवण्याचा प्रयत्न नक्की करू जेणेकरून ऑस्ट्रेलियानंतर लागोपाठ दोन वेळा आयसीसीची स्पर्धा जिंकण्याची किमया करता येईल. ब्रिटनमध्ये भारतीय चाहते देखील असंख्य आहेत आणि हेच आमचे प्रेरणास्थान ठरेल. तेथेही भारतासारखंच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.

व्हिट्टोरीची ड्रीम टीम
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने काल आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला स्थान मिळाले नाही. व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमचे नेतृत्व रणमशीन विराट कोहलीकडे सोपवले आहे. लॉर्डस क्रिकेट मैदानाच्या सहकार्याने व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमची निवड केली. यामध्ये भारताच्या तीन, ऑस्ट्रेलियाच्या चार, श्रीलंकेच्या दोन, आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. द. आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हिट्टोरीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीची आपल्या ऑल टाइम इलेव्हनमध्ये निवड केली आहे.