चुकीच्या धोरणामुळे देशात अराजकतेसारखी परिस्थिती: मायावती

0

लखनऊः कॉंग्रेसच्या पावलावर पाउल ठेवत भाजपाची वाटचाल सुरु असून, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशात आज अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे. मायावतींनी बुधवारी राजधानी लखनऊमध्ये ६४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे काँग्रेसच्या सरकारने काम केले त्याच पद्धतीनं भाजपाचं काम सुरू आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच तणाव आणि अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

लखनऊमधल्या मॉल एव्हेन्यूस्थित बसपा मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गरीब आणि दलित विरोधी कृत्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून बाहेर हाकललं. आता सत्तेत आलेल्या भाजपाचीसुद्धा त्याच मार्गानं वाटचाल सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची दशा खालावत चाललेली असून, देशाची अवस्था वाईट आहे. केंद्राच्या चुकीच्या नीतींमुळे आज देशातील गोरगरीब जनता त्रासलेली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

खरं तर भाजपा काँग्रेसपेक्षा दोन पावलं पुढेच आहे. काँग्रेसमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत परतली आहे. आता काँग्रेस अँड कंपनी भाजपाच्या चुकीच्या धोरणांचा हवाला देत सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गरिबांच्या दुःखाची बसपाला कल्पना आहे. गरिबांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायमच लढत राहू, असंही मायावती म्हणाल्या आहेत. मायावतींनी नोटाबंदी, जीएसटी, सीएए, एनआरसी आणि एनपीआर सारखे मुद्दे उपस्थित करत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी करण्यापेक्षा केंद्रानं गरीब, दलित, आदिवासी आणि मागास वर्गाच्या कल्याणासाठी काम केलं असतं ते योग्य ठरलं असतं.

Copy