चाळीसगाव शहरात होणारे भारनियमन त्वरीत बंद करा

0

रयत सेनेचे वीज वितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन
चाळीसगाव- सध्या चाळीसगाव शहरासह तालुकाभरात नवरात्रोत्सवउत्साहात साजरा केला जात आहे; मात्र सण उत्सव काळात भारनियमन होत असल्याने व ऑक्टोबर महिन्यात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यापार्श्‍वभूमीवर खडकी फिडर व टाउन फिडरवरील भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी रयत सेनेतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

वीजवितरणला आंदोलनाचा इशारा
वीजवितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात तेरा तास भारनियमन केले जात आहे, तसेच शहरातील नदी पलीकडील टाउन फिडरवर तीन शिप्टमध्ये नऊ तास जाचक भारनियमन होत असल्याने नागरिकांमध्ये वीजवितरण कंपनी विरोधात प्रचंड नाराजी असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात तसेच सण उत्सव काळात भारनियमन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात उभे पिक वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना जामडी व परीसरातील शेतात पीके उभी असुन दिवसभर भारनियमन केले जात असून शेतीसाठी रात्री 12 वाजेनंतर विजपुरवठा सुरू केला जातो, त्यामुळे शेतकर्‍यांना रात्री अपरात्री शेतात जावून पिकांना पाणी भरावे लागत असल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. शेतीसाठी दिवसा विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकर्‍यांमधुन होत आहे. ग्रामीण भागात दिवसा भारनियमन असल्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचे कामकाज देखील होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खडकी फिडर व टाउन फिडर वरील विज भारनियमन विज वितरण कंपनी ने भारनियमन तात्काळ बंद करावे अन्यथा रयत सेनेच्या वतीने विज वितरण कंपनी कार्यालया समोर उग्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, नितीन जाधव, विजय जाधव, रुस्तम अली, सिताराम यादव, दिनेश गायकवाड, गौरव गायकवाड, राजु शिंदे, दिपक पाटील, सप्निल जाधव, दिनेश मराठे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Copy