Private Advt

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वेच्या आता 11 एप्रिलपासून आणखी दोन फेर्‍या

चाळीसगाव : पॅसेंजर ट्रेनमधून रूपांतरीत झालेली चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन तब्बल दोन वर्षांनी 13 डिसेंबर 2021 रोजी रुळावरून धावली होती. मात्र, दिवसभरातून केवळ दोनच फेर्‍या होत असल्याने प्रवाशांचे हाल होत असत. आता राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने 11 एप्रिलपासून मेमू ट्रेन पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मेमू ट्रेनच्या दिवसभरातून एकूण चार फेर्‍या होणार असल्याने प्रवाशांची त्रासातून मुक्तता होणार आहे.

प्रवाशांच्या मागणीला यश
मुंबई लोकलच्या धर्तीवर ही रेल्वे सुरू केल्याने नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी पाच महिन्यांपासून संपावर गेले आहेत. त्यात खासगी वाहनधारकांची मनमानी व मेमू ट्रेनच्या दोनच फेर्‍यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे चार फेर्‍या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाचा इशाराही दिला होता.

या वेळेत पूर्ण क्षमतेचे धावणार मेमू
आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने मेमू ट्रेनही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. 11 एप्रिलपासून मेेमूच्या नेहमीप्रमाणे दिवसभरात चार फेर्‍या होतील. चाळीसगाव येथून सकाळी 6.30 व 9.50 वाजता तसेच दुपारी 1.40 व सायंकाळी 5.30 या वेळेत ही मेमू ट्रेन धुळ्याकडे रवाना होईल.