Private Advt

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या चौघा लाचखोर पोलिसांचे अखेर निलंबन

आमदार मंगेश चव्हाणांकडून स्वीकारली होती लाच : चौकशीअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई

चाळीसगाव/भुसावळ : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी औट्रम घाटात पोलिसांकडून अवैधरीत्या होणार्‍या वसुलीचा स्टींगद्वारे पर्दाफाश केल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. अवैधरीत्या वसुली करणार्‍या पोलिसांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच चौकशी अंती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील चौघा पोलिसांचे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या लाचखोरांवर निलंबनाची कारवाई
हवालदार गणेश वसंत पाटील, हवालदार प्रकाश भगवान ठाकूर, कॉन्स्टेबल सतीश नरसिंग राजपूत, कॉन्स्टेबल संदीप भरत पाटील अशी निलंबीत कर्मचार्‍यांची नावे आहेत. निलंबन काळात कोणतीही खाजगी नोकरी वा व्यवसाय करू नये, असे आदेशात नमूद असून तसे आढळल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल तसेच गैरवर्तवणुकीमुळे अनुज्ञेय असलेला भत्ता कर्मचारी गमावतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे.

आमदारांना केली होती अरेरावी !
चाळीसगाव-कन्नड मार्गावरील औट्रम घाटात पोलिसांकडून सुरू असलेल्या अवैध वसुलीबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी स्वतः ट्रक चालक होत गुरुवारी स्टींग ऑपरेशन केले. वसुलीसाठी गाडी थांबवलेल्या झिरो पोलिसाला त्यांनी 500 रुपये देऊन बाकीचे पैसे परत मागितले. बाकी पैसे परत देणार नसल्याचे सांगत त्याने आमदारांना अरेरावी केल्यावर आमदारांनीही मग आपला इंगा दाखवला ! हे असे घडत असताना गस्तीसाठी नेमलेले आणि आमदारांना ओळखणारे पोलीस दोन मिनिटात घटनास्थळावरून अक्षरशः धूम ठोकत पळाले. सोशल मीडियावर या घटनाक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळली होती. आमदार चव्हाण यांनी या गंभीर प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.