चाळीसगावात शिवदर्शन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

चाळीसगांव । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्री निमित्ताने विशाल शिवदर्शन महोत्सवास प्रतिसाद लाभला असून चाळीसगाव शहरासहीत तालुक्यातून नागरीकांची दर्शनासाठी रिघ लागलेली आहे. महाशिवरात्रीस 27 हजारापेक्षा जास्त नागरीकांनी भेट दिली. विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करणारे ‘शिवदर्शन महाशिवरात्री महोत्सव’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन शहरात 20 ते 27 फेब्रुवारी, 2017 दरम्यान लक्ष्मीनगर, राजपूत मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या सिताराम पहेलवान यांच्या मैदानात करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी महोत्सव खुले आहे.

बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन
भगवान शिवाचे भारतातील विविध ठिकाणाचे बारा ज्योर्तिलिंगम् साकारण्यात आले असून भव्य प्रतिकृतींचे नागरीक दर्शन घेण्यासाठी रांगा लावता आहेत. दर्शनाबरोबर बारा ज्योर्तिलिंगाचे महत्व सांगण्यात येत असल्यामुळे नागरीकांना अभ्यासपूर्ण माहिती मिळत आहे. दररोज सकाळी, संध्याकाळी महाआरतीस 5 हजारावर लास्त नागरीक हजर असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

17 फुटी कुंभकर्ण महोत्सवाचे आकर्षण
महोत्सवातील 17 फुटी भव्य कुंभकर्ण अबालवृद्धांचे आकर्षण ठरलाय. रामायणातील कुंभकर्ण व्यक्तिरेखा ही आजच्या युगात अज्ञान निद्रेत पहूडलेल्या मानव समाजाचे प्रतिकात्मक रुप आहे. मानवास व्यसन, विकारांचे वाईट परिणाम समजून देखील तो त्यांकडे काना डोळा करतो. व्यसन आणि मनोविकारांपासून सुटका कशी करता येईल यासाठी कुंभकर्णाची भव्य आरास उभारण्यात आली असून ध्वनी प्रकाश योजनेद्वारे या अज्ञानतेच्या, व्यसनाधिनतेच्या निद्रेतून मानवास कसे जागृत होता येईल याचे मार्गदर्शन मिळत आहे.

28 ला महोत्सवाची सांगता
व्यसने, मनोविकार, अवगुण आदिंनी मानव समाजग्रस्त असतांना जीवनात नैतिक मूल्ये, दैवी आणि दिव्य गुणांच्या सुंगध पसरवून जीवन कमल पुष्पा सारखे पवित्र बनविणे, परिवार व समाजाचे वातावरण शांती, प्रेम, सदभावनायुक्त कसे निर्माण होईल यासंबंधी महोत्सवात प्रबोधन करण्यात येते. व्यसनमुक्ती, स्वर्ग आरास, परमात्मा परीयच, आदि अनेक आरासमुळे सुध्दा प्रबोधन होत आहे. 28 पर्यंत महोत्सव सर्वांसाठी खूला असणार असून नागरीकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले आहे.