चाळीसगावात तालुक्यातील विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली

जळगाव : युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय अ‍ॅम्बेसीने पत्रक काढून पोलंडकडे जाण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास युक्रेनमध्ये शिक्षण घेणार्‍या तीनशे विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर तीस किलोमीटरचा प्रवास करत पोलंडच्या बॉर्डरकडे पायीच चालून प्रवास केला असता सहा ते सात किलोमीटर बॉर्डरआधीच थांबवून पोलंडकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थिनीचाही समावेश आहे. दरम्यान, या ठिकाणची परीस्थिती पाहिली तर अक्षरशः तीन अंश सेल्सिअस तापमान असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थी अडचणीत
तीन दिवसापासून अंगावरच्या कपड्यावर असताना या ठिकाणी विद्यार्थी अतिशय अडचणीत आहेत. भारतीय अ‍ॅम्बेसिसने काढलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले असतानाही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अडवले जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत.

बँका बंद, अन्न-पाण्यासाठीही वणवण
होस्टेलही खाली करण्यात आल्यानंतर बँका बंद असल्याने पैसेही काढता येत नसल्याने या ठिकाणी तीन दिवसांपासून हे मुले अन्न, पाणी विना मरण यातना सहन करत अतिशय बिकट अशा परिस्थितीत आहेत. भारत सरकारने या विद्यार्थ्यांची दखल घ्यावी, अशी पालकांकडून मागणी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील यांची भाची क्षितीजा सोनवणे ही अडकली असून सदर विद्यार्थिनी चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील मुळ रहिवासी असल्याचे कळते.